जगात सौंदर्य स्पर्धांपैकी एक महत्त्वाची आणि सर्वांत लोकप्रिय स्पर्धा म्हणजे ‘मिस वर्ल्ड’. हा किताब पटकावण्याची असंख्य सौंदर्यवतींची इच्छा असते. आजवर सहा भारतीय महिलांनी ही स्पर्धा जिंकली आहे. यामध्ये जिंकलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन आणि प्रियांका चोप्रा या दोन्ही अभिनेत्री आज कलाविश्वामधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी आहेत. ऐश्वर्याने १९९४ साली हा पुरस्कार जिंकला. तर प्रियांकाने २००० साली. मात्र प्रियांका मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिची सर्वाधिक चर्चा रंगली होती. प्रियांकाने अंतिम फेरीमध्ये मदर तेरेसा यांच्याविषयीचे विचार सर्वांसमोर मांडत अनेकांची मनं जिंकली होती.
२००० साली मिस वर्ल्ड झालेल्या प्रियांकाला ‘तू अशा कोणत्या महिलेचा आदर्श मानतेस ज्या सध्या हयात आहेत’? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी प्रियांकाने मदर तेरेसा यांच्याविषयीचे विचार मांडले होते. तिचे विचार ऐकल्यानंतर तिला मिस वर्ल्डचा पुरस्कार देण्यात आला.
“अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांचं मी मनापासून कौतूक करते आणि त्यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. त्यामध्येच मदर तेरेसा यांचाही समावेश आहे. त्या अत्यंत प्रेमळ, उत्साही आणि माणूसकी जपणाऱ्या होत्या. त्यांच्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं”,असं प्रियांका म्हणाली. मात्र मदर तेरेसा यांचं निधन झालं होतं आणि परिक्षकांनी हयात असलेल्या आदर्श महिलेचं नाव विचारलं होतं. त्यावर प्रियांकाने दिलेल्या उत्तराने अनेकांची मन जिंकली.
प्रियांका म्हणाली, “मदर तेरेसा यांचं जरी निधन झालं असलं तरीदेखील त्या आमच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे”. विशेष म्हणजे प्रियांकाने दिलेलं हे उत्तर परिक्षकांना प्रचंड आवडलं आणि प्रियांका मिस वर्ल्डचा पुरस्कार मिळाला.
दरम्यान, कलाविश्वातील उल्लेखनीय कामगिरीसोबतच ‘देसी गर्ल’ समाजसेवेतही सक्रिय आहे. विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रियांकाला तिच्या याच समाजसेवेसाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार मिळाला आहे.