मराठीतील थरारपट म्हटलं की झपाटलेला, पछाडलेला अशाच चित्रपटांची आठवण येते. याच्या तुलनेत बॉलीवूड बघितलं तर तिथे भूत, वास्तुशास्त्र असे अंगावर काटा आणणारे चित्रपट पाहावयास मिळतात. त्याच्याच तोडीचा चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला आहे तो दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी. आगळ्यावेगळ्या विषयावर चित्रपट बनवण ही गजेंद्र अहिरे यांची खासियत आहे. आज त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अनवट.. एक अनपेक्षित ‘हा थरारपट प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाची कथा ही एका गावात घडते. मधुरा (उर्मिला कानेटकर-कोठारे) आणि विनय (आदिनाथ कोठारे) हे नुकतेच लग्न झालेले जोडपे. विनयने लग्नानंतर एक वर्ष तरी गावात राहावे अशी त्याच्या आजोबांची इच्छा असते. त्याखातरं तो पत्नीसोबत कोकणातील एका गावात राहण्यास जातो. विनय हा डॉक्टर तर मधुरा पुरातत्वशास्त्रज्ञ असते. त्यामुळे मधुराला छायाचित्र काढण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची आवड असते. हे दोघेही तेथील वाड्यात राहू लागतात. वाड्याच्या देखभालीची जबाबदारी बायजमावर (विभावरी देशपांडे) असते. याच दरम्यान मधुराला विचित्र भास होऊ लागतात. आंघोळी करताना कोणी तरी आपल्याला पाहतयं, अंगाला होणारा पुरुषी स्पर्श तिला जाणवू लागतो. त्यातून गावात चालणा-या प्रथा या तिला आणखीन गुंतवू लागतात. गावात साथीचा रोग आला की बोकडाचा बळी देण, अंगात येणे असे प्रकार गावात सुरु असतात. तर दुसरीकडे विनय त्याच्या डॉक्टरीच्या कामात व्यस्त असतो. त्याच्यासोबतीला कामत (मकरंद अनासपुरे) हे नेहमीच असतात. गावच्या दवाखान्याची जबाबदारी ही त्यांच्याकडे असते. मधुरा आणि विनय राहत असलेल्या वाड्यात भूत आहे, पुन्हा संध्याकाळच्या वेळेला केवड्याच्या झाडाजवळ जायचं नाही अशा काही गोष्टी गावकरी सांगत असतात. मधुराचा यावर थोडासा विश्वास बसतोही, पण विनय डॉक्टर असल्यामुळे त्याचा केवळ शास्त्रावरचं विश्वास असतो. मग आता तिथे खरचं भूत आहे की नाही? आणि असेल तर ते कोणाच? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. पण चित्रपटाच्या नावाताचं अनपेक्षित असं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथेबाबत अधिक सांगण योग्य ठरणार नाही.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच त्यात काही अनपेक्षित गोष्टी पाहावयास मिळतात. आपल्या मनात जशी गोष्ट तयार होते त्याप्रमाणे तसं काही घडतच नाही. त्यामुळे कथेतील गूढ जेव्हा उकललं जात तेव्हा आपल्यालाही पाहून अनपेक्षित धक्काच बसतो. मध्यांतरानंतर चित्रपटाची कथा भक्कम वाटते. मध्यांतरापर्यंत धिम्या गतीने जाणारा हा चित्रपट त्यानंतर लगेचचं वेगळ वळण घेतो. कथेत घेतलेल वळण याबाबत गजेंद्र अहिरेंच कौतुक केल पाहिजे. पण थरारपट आहे म्हणून तुम्हाला अगदीचं काही हा चित्रपट घाबरवत नाही. त्यातल्या त्यात एखाद दोन दृश्य अंगावर काटा मात्र आणतात. चित्रपटात घेतलेली लोकेशन्स ही अप्रतिम आहेत. गोवा, कोकणातील नयनरमणीय दृश्य सुखद वाटतात. मराठीतील प्रसिद्ध जोडी उर्मिला कानेटकर-कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर जोडप्याच्या भूमिकेत दिसत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. उर्मिला ही अभिनयाच्या बाबतीत तरबेज आहेच, पण यावेळी आपल्या भूमिकेने आदिनाथने तिच्यावर मात केली. मकरंद अनासपुरेला आपण नेहमीच विनोदी कलाकार म्हणून पाहात आलो आहोत. यात तो वेगळ्या रुपात पाहायला मिळतो त्यामुळे नेहमीच खिदीखिदी करत विनोद करणारा मकरंद शांत, गंभीर स्वरुपात आपले लक्ष्य वेधतो.  ‘तरुण आहे रात्र अजुनी’ आणि ‘ये रे घना ये रे घना’ ही मराठीतील गाजलेली अजरामर भावगीते अजूनही आपल्यावर तशीच छाप पाडतात. अखेर जुनं ते सोनं म्हणतात ते उगीचचं नाही. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने नेहमीप्रमाणेच आपल्या संगीताची जादू या गीतांद्वारे चालवली आहे. ऐन पावसाळ्यात पुन्हा जीवंत झालेली ही गाणी आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातात. त्यामुळे तुमचा हा विकएन्ड अगदीच काही वाया जाणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कथा, पटकथा, दिग्दर्शन- गजेंद्र अहिरे
कलाकार- मकरंद अनासपुरे, किशोर कदम, उर्मिला कानेटकर, आदिनाथ कोठारे, भार्गवी चिरमुले, विभावरी देशपांडे
संगीत दिग्दर्शक- पं.हृदयनाथ मंगेशकर
संगीत- शंकर-एहसान-लॉय

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review of anvat ek anpekshit
First published on: 25-07-2014 at 08:19 IST