|| गायत्री हसबनीस
मराठीतील अनेक कलाकार सध्या मराठी-हिंदूी चित्रपट, वेबमालिका अशा भिन्न माध्यमांमधून एकाच वेळी काम करताना दिसत आहेत. अभिनेत्री गीतांजली कुलकर्णीही त्याला अपवाद नाही. गीतांजली यांची भूमिका असलेला ‘कारखानीसांची वारी’ हा चित्रपट सध्या सोनी लिव्ह या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे. तर डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘आर्या २’ या वेबमालिकेतही त्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहेत.
गेल्या वर्षी ‘आर्या’ ही वेबमालिका प्रदर्शित झाली आणि ती प्रचंड गाजली. आता याचे दुसरे पर्वही दाखल झाले आहे. ओटीटी हे माध्यमच मुळात आजच्या काळात खूप महत्त्वाचे ठरले आहे, अशी भूमिका गीतांजली यांनी मांडली. प्रेक्षकांना हवं तसं मनोरंजन ओटीटीवर चोवीस तास, वर्षांचे ३६५ दिवस उपलब्ध आहे. वेबमालिका किंवा वेबपटांमधून केलेले काम जगभरात पोहोचते आणि प्रेक्षकांचा ताबडतोब प्रतिसाद समाजमाध्यमांवरून कळत असतो. खरंतर या माध्यमाने आपल्याला हवं ते निवड करून पाहण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे ओटीटीवर येणाऱ्या वेबमालिकांमधून संदेशात्मक आशयापेक्षा जास्तीत जास्त मानवी भावभावना चितारणाऱ्या कथा पाहायला मिळायला हव्यात, असं त्या म्हणतात.
‘आर्या २’चा एकूणच प्रवास फार आनंददायी होता, असं त्या सांगतात. ऑडिशन दिल्यानंतर माझी ‘आर्या’साठी निवड झाली. निवड झाल्यानंतर थरारपटाचा जॉनर असल्यामुळे या मालिकेचा पट खूप मोठा असल्याचं माझ्या लक्षात आलं. ‘आनंदी गोपाळ’सारख्या भव्यदिव्य चित्रपटानंतर अशा मोठय़ा पटाचा मी पुन्हा एकदा भाग झाले आहे. ‘कोर्ट’, ‘ताज महाल ८९’, ‘गुलंक’ यातील माझ्या भूमिका या स्वतंत्र अशा होत्या. ‘आर्या’मध्ये मी पोलिसाची भूमिका करते आहे, जी लहान असली तरी महत्त्वाची आहे, असं त्यांनी सांगितलं. खरं सांगायचं झालं तर यापूर्वी माझ्या भूमिकांप्रमाणे मी बऱ्याचदा भारतीय पोशाख परिधान केले आहेत. या वेबमालिकेतील सुशीला शेखर हे पात्र पाश्चात्त्य कपडे परिधान करणारं आहे, एकतर पोलीस असल्याने त्या वर्दीमुळेही तिच्यात एक तडफदारपणा आलेला आहे. हे एक माझ्यासाठी वेगळं आकर्षण होतं. या व्यक्तिरेखेच्या छटा सांगायच्या झाल्याच तर सुशीला खूप आकांक्षावादी, ध्येयवादी विचारांची आहे. तिच्या आयुष्याबद्दल खूप मागण्या आहेत. एकदंरीतच भूमिकेतील वेगळेपण मला भावल्यामुळे नक्कीच यातून नवीन काही शोधू शकेन, असा विश्वास वाटल्याचं त्यांनी सांगितलं.
माझ्यासारख्या मध्यम वयाच्या अभिनेत्रीला दर्जेदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी ओटीटीवर मिळते आहे, अशा शब्दांत ओटीटीने अनेक कलाकारांना संधीचे मोठे दालन कसे उपलब्ध करून दिले आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. ‘‘दूरचित्रवाणीवर मालिका करताना मला तितकंसं मोकळं वाटत नाही, कारण माझ्या मते, तुम्ही तिथे खूप काळासाठी अडकून पडता. ओटीटीमध्येही वेब‘मालिका’ असं आपण म्हणत असलो तरी तिथे मर्यादित वेळ असतो आणि त्यामुळेच अधिक वाव मिळतो. उदाहरणार्थ, एका मालिकेत पाच-सात भाग जरी असले तरी छोटय़ाशा भूमिकेलाही महत्त्व प्राप्त होते. नुसतं आलं पात्र आणि गेलं, असं तिथे होत नाही. ‘नेटफ्लिक्स’वर मी ‘सिलेक्शन डे’ नावाची वेबमालिका केली होती. ज्यात माझे पात्र लहान असले तरी त्याला एक कथा होती, वेगळा आलेख होता. त्याला सुरुवात, मध्य आणि शेवट होता. त्या पात्राला कुठेच अस्तित्व नाही असे कधीही वाटले नाही, असं त्या सांगतात. मात्र एक कलाकार म्हणून अर्थातच मोठय़ा भूमिका करायला आपल्याला आवडतात, अशी मनमोकळी कबुलीही त्यांनी दिली. ओटीटीवरच्या वेबमालिका या तांत्रिकदृष्टय़ा उच्च निर्मिती असलेल्या आणि सर्जनशीलतेने कथा हाताळणाऱ्या असल्यानेच या माध्यमावर काम करायला आवडत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नाटकाचा फायदा
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे आणि नाटकांमध्ये कसदार कामे केल्यामुळे पात्र रंगवण्याच्या शैलीची चांगलीच तयारी झाली आहे. नाटकात काम केल्याचा फायदा नक्कीच ओटीटीसाठी होतो. हे फारच तांत्रिक माध्यम आहे. त्यामुळे मी स्वत: सगळं काही नीट समजून घेते. शॉट कसा लागलाय हे समजून, कुठे कशी लेन्स लावली आहे आणि काय कट होणार आहे हे सगळं मी विचारून घेते. लाइट कसा आहे? किंवा मार्क कुठे आहे?, अशा सर्वच तांत्रिक बाबी मी विचारून घेते. नाटकातील तालमींच्या सवयींमुळे मला कॅमेऱ्यासमोर अधिक काम केल्याचा थकवा येत नाही’, असं सांगत नाटकात यापुढेही काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओटीटीवर हिसा दाखवली जाते किंवा गुन्हेगारीच दाखवली जाते, या नाहक तक्रारी केल्या जातात. त्यावर उत्तमोत्तम वेबमालिका, चित्रपट उपलब्ध माध्यमावर आहेत. ओटीटीबद्दल केल्या जाणाऱ्या तक्रारींमध्येच अडकलेला प्रेक्षक चांगले विषय पाहात नाही, असं माझं अजिबात म्हणणं नाही. मात्र इथल्या दर्जेदार वेबमालिकांना भरभरून प्रतिसादही देणारा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. अनेकदा आशय आवडल्यामुळे वेबमालिकांचे नवनवे पर्व प्रदर्शित होतात. मी ‘गुलंक’ वेबमालिका केली होती, ती प्रेक्षकांना इतकी आवडली की त्याचा दुसरा भागही करण्यात आला.
गीतांजली कुलकर्णी