एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरीने एका आठवड्यात ९४.१३ कोटींची कमाई केली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपुतची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमात धोनीच्या बालपणापासून ते एक यशस्वी कर्णधारापर्यंतचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. या सिनेमात माहीचा जीवनप्रवास दाखवण्यात आला असला तरी त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वपूर्ण व्यक्तिला या सिनेमाचा हिस्सा मात्र बनवले नाही. धोनीच्या कुटुंबाची ओळख देताना भावंडांमध्ये फक्त त्याच्या मोठ्या बहिणीलाच म्हणजे जयंती हिलाच दाखवण्यात आले आहे. भूमिका चावलाने जयंतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पण फार कमी जणांना हे माहित आहे की धोनीला मोठा भाऊही असून त्याचे नाव नरेंद्रसिंग धोनी आहे. दिग्दर्शक नीरज पांडेने धोनी आणि त्याची बहिण यांचेच नाते सिनेमात दाखवले आहे. त्यामुळे धोनीला फक्त एकच मोठी बहिण आहे असा समज प्रेक्षकांचा होत आहे. रांचीमध्ये समाजवादी पार्टीचे नेता असलेल्या नरेंद्र यांनाही सिनेमात त्यांची व्यक्तिरेखा न घेतल्याबद्दल काही आक्षेप नाहीए. द टेलीग्राफ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माहीपेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या नरेंद्र यांनी सांगितले की माझी व्यक्तिरेखा सिनेमात घ्यायची की नाही हा सर्वस्वी निर्मात्यांचा निर्णय होता. यात मी काहीच करु शकत नाही.
नरेंद्र पुढे म्हणाले की, त्याचे बालपण किंवा तारुण्यात त्याने केलेला संघर्ष किंवा एमएसडी बनेपर्यंतचे त्याने घेतलेले कष्ट या सर्वामध्ये कदाचित माझं महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात फार योगदान नसेल, म्हणून मी या सिनेमात नाहीए. त्यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी धोनीपेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. जेव्हा धोनीने पहिल्यांदा बॅट उचलेली तेव्हा मी जेव्हीएम- शामलीपासून दूर होतो. मी १९९१ पर्यंत घरापासून लांब होतो. मी रांचीमध्ये परत येण्याच्या आधी अल्मोडाच्या कुमाऊ युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलो होतो. असे जरी असले तरी माहीच्या आयुष्यात माझे नैतिक योगदान जरुर आहे. पण ते या सिनेमात दाखवणे मुश्किल होते.
नरेंद्रने सांगितले की, याचा अर्थ हा नाही की मी माहीच्या मोठा भावाची जबाबदारी कधी निभावली नाही. मला चांगलेच आठवते की रांची जिल्हा स्पर्धेत जेव्हा एका ओव्हरमध्ये माहीने पाच चौकार लगावले होते तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. नंतरही जेव्हा जेव्हा मी घरी यायचो तेव्हा त्याची मॅच आवर्जून बघायचो.