कलाकाराने यश मिळवण्यासाठी सोप्या मार्गाचा वापर करू नये. भरपूर प्रेमाने मेहनत घेत काम करावं. यश आणि अपयश हे आपल्या समजुतीसाठी असतं. कारण एखाद्या कामात समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपण भरपूर मेहनत घेऊन कष्ट करून एखादी गोष्ट मिळवतो. वेगाने चढलेल्या यशाच्या पायऱ्या तितक्याच वेगाने उतरल्या जाऊ शकतात. कष्टाने चढलेल्या पायऱ्या उतरायलाही वेळ लागतो.

मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून सशक्त भूमिका करत मुक्ताने तिचा एक मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. अभ्यासू, मेहनती, प्रामाणिक कलावंत ही तिची ओळख कलाक्षेत्रातील इतरांनाही प्रेरणादायी आहे. ही ओळख तिने कष्टाने निर्माण केली आहे. यशासाठी सोपा मार्ग नसतो, कष्टपूर्वक मिळालेलं यशच टिकतं, असं सांगत मुक्ता या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना भरपूर मेहनत करा असा सल्ला देते.

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

मुक्ता सध्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या प्रोमोमधून लक्ष वेधून घेते आहे. या चित्रपटात मुक्ताने नम्रता संभेराव, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने, सारंग साठ्ये, आशा ज्ञाते अशा विनोदाच्या बाबतीत एकापेक्षा एक सरस असलेल्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची निर्मिती अभिनेता स्वप्निल जोशी, लेखिका मधुगंधा कुलकर्णी, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मधुगंधा कुलकर्णीसारख्या जुन्या मैत्रिणीबरोबर काम करण्याची संधी, परेश मोकाशींच्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अशा विविध गोष्टींवर मुक्ताने ‘लोकसत्ता’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

हेही वाचा >>>Video: स्वतःच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बाबाची गोष्ट, ‘जुनं फर्निचर’चा विचार करायला भाग पाडणारा ट्रेलर प्रदर्शित

‘या चित्रपटाची सुरुवातच माझ्यासाठी खूप मजेदार पद्धतीने झाली’ असं म्हणत मुक्ता हा किस्सा सांगते. ‘मी आणि मधुगंधा महाविद्यालयात एकत्र होतो. आमची २० वर्षांची ओळख आहे. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. तसंच, परेश हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. तरीही इतकी वर्ष त्या दोघांबरोबर एकत्र काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नव्हती. अचानक एक दिवशी मधुगंधाचा फोन आला. मी आणि परेश एक चित्रपट करतो आहोत आणि त्यातील एका पात्रासाठी आम्ही तुझा विचार करतो आहोत असं सांगितलं. तेव्हाच मी माझा होकार कळवला. त्यानंतर या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाली. वेळेचं नियोजन पूर्ण झाल्यानंतर हातात पडलेली पटकथा मी वाचली. मला तत्क्षणीच पटकथा आवडली आणि अशा प्रकारे मी या चित्रपटाचा भाग झाले’ असं मुक्ता सांगते.

या चित्रपटातील सहकलाकार आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याबद्दल आपलं मत मांडताना ती म्हणाली, ‘माझ्याबरोबर या चित्रपटात काम करणाऱ्या सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने, नम्रता संभेराव या फक्त विनोदी अभिनेत्री म्हणून नाही तर कलाकार म्हणून उत्तम आहेत. सारंग साठ्येबरोबर काम करायलाही मला खूप मजा आली. प्रत्येक दृश्य देताना आम्ही सगळेच नवनवीन जागा काढण्याचा प्रयत्न करायचो, एकमेकांना सांभाळून घ्यायचो, त्यामुळे एकमेकांना मदतही होत होती आणि दृश्यही छान रंगत होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने मी जास्त वेळ नम्रताबरोबर काम केलं आहे. खूप आनंददायी अनुभव होता तो… चित्रपट कधी संपला हे लक्षातही आलं नाही इतकी धमाल मस्ती करत आम्ही चित्रीकरण पूर्ण केलं’. दिग्दर्शनाची परेशची एक वेगळी शैली आहे, असं सांगत त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा मनावरचा थकवा दूर करणारा होता, असं तिने सांगितलं. ‘कोणतंही दडपण न देता परेश आपल्या कलाकारांकडून काम करून घेतो. पटकथा वाचनाची सुरुवात करण्यापासून ते चित्रीकरण सुरू होईपर्यंत त्याने आमच्याकडून उत्तम तयारी करून घेतली होती. जगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे आहे. त्या दृष्टीने तो त्याच्या कलाकारांसोबत काम करतो. हे फार मजेशीर वाटलं. परेशने माझ्याकडून फार उत्तम पद्धतीने काम करून घेतलं आणि एक अभिनेत्री म्हणून आणखी श्रीमंत केलं’ अशा शब्दांत तिने परेश मोकाशी यांचं कौतुक केलं.

हेही वाचा >>>‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांचे फायदे आणि आव्हानंही फार वेगवेगळी आहेत, असं ती म्हणते. तांत्रिकदृष्ट्या हे तिन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत. चित्रपटात मोठ्या पडद्यावर कलाकारांना पाहण्याचा आनंद मिळतो. मालिकांमध्ये रोज टीव्हीवर प्रेक्षक कलाकारांना पाहू शकतात आणि मराठी नाटक हा तर आपल्यासाठी सांस्कृतिक ठेवा आहे. अभ्यास केलाच पाहिजे अशी नाटक ही गोष्ट आहे. या तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना भान ठेवून काम करावं लागतं, पण या तिन्हींमध्ये एकच गोष्ट समान आहे ते म्हणजे कलाकाराचा होणारा परकाया प्रवेश. तुम्ही एक नवीन पात्र होत असता, त्या दृष्टीने अभिनय करता हे महत्त्वाचं आहे, असं तिने सांगितलं.

रंगभूमीवर मुक्ताचं ‘चारचौघी’ हे नाटक जोरात सुरू आहे. ते सांभाळून चित्रपटांसाठी वेळेचं नियोजन करण्याच्या कसरतीविषयी ती सांगते, गेल्या सव्वा वर्षांमध्ये ‘चारचौघी’ या नाटकाचे पावणेतीनशे प्रयोग झालेले आहेत. महोत्सवातील प्रयोग, अमेरिका-लंडन दौऱ्यातील प्रयोग तसंच ‘नाच गं घुमा’ आणि ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटांसाठी वेळेचं नियोजन करताना दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांचा फार मोठा पाठिंबा मला मिळाला, कारण नाटकाइतकेच चित्रपटही फार महत्त्वाचे आहेत हे नाट्य निर्मात्यांना माहिती होतं. तसंच नाटकाचे प्रयोगही महत्त्वाचे आहेत हे चित्रपटाच्या निर्मात्यांना माहिती होतं. दोन्हींकडून पाठिंबा असल्याने गोष्टी जमून आल्या, असं मुक्ता सांगते.

‘२०२४ हे वर्ष ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटापासून सुरू झालं आणि चित्रपटाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर ‘चारचौघी’ या नाटकाचे प्रयोगदेखील मोठ्या उत्साहात सुरू आहेत आणि आत्ता १ मे रोजी ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवाय, माझ्या दोन आगामी चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण केलेलं आहे. त्यातील एक या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. अधिकृतपणे या चित्रपटाची अजून घोषणा झालेली नाही. आणखी काही उत्तम पटकथा माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत, त्यामुळे या वर्षात मी छान प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे’ असं तिने या वर्षीच्या तिच्या कामांविषयी सांगितलं.

मुक्ता बर्वे