‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘शूटआऊट अॅट वडाला’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘सरकार’, ‘एक हसिना थी’सारख्या सुपरहिट चित्रपटांना पार्श्वसंगीत देणारे संगीतकार अमर मोहिले चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. ‘अमर मोहिले प्रॉडक्शन्स’ बॅनरअंतर्गत ‘ए फायनल’ या आगळ्यावेगळ्या म्युझिकल चित्रपटाची ते निर्मिती करत आहेत.
‘अर्जुन’ चित्रपटाचे लेखक–दिग्दर्शक एफ. एम. इलियास यांनी ‘अमर मोहिले प्रॉडक्शन्स’च्या या पहिल्या चित्रपटाची धुरा उचलली आहे. कथा त्यांचीच असून त्यांनी व अब्राहम अफगाण यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद अब्राहम अफगाण यांचे आहेत. तर संगीत आणि पार्श्वसंगीताची बाजू स्वत: अमर मोहिले यांनी सांभाळली आहे.
एका दृष्टिहीन व्हॉयलिन वादक मुलीची संवेदनशील कथा ‘ए फायनल’ मधून मांडण्यात येणार आहे. एफ. एम. इलियास म्हणाले, यातील दृष्टिहीन मुलीची मध्यवर्ती भूमिका साकारणं हे मोठं आव्हान असून, त्यासाठी आम्ही योग्य अभिनेत्रीच्या शोधात आहोत. प्रस्थापित अभिनेत्रींपैकी काहींचा विचार सुरू असून, काही नव्या मुलींचीही ऑडिशन घेत आहोत. संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर तोलून धरणाची क्षमता असलेल्या अभिनेत्रीची गरज असल्याचेदेखील ते म्हणाले.
अमर मोहिले यांनी चित्रपटनिर्मितीत प्रवेश करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अमर हे दिवंगत संगीतकार अनिल मोहिले यांचे चिरंजीव असून चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला होताच. त्या जोरावर हिंदीत पार्श्वसंगीतकार म्हणून यशस्वी झालो. पण निर्माता झालो तर पहिला चित्रपट मराठीच करायचा, हे आपण ठरवलं होतं. एफ. एम. इलियास यांच्या ‘भाई कोतवाल’ या चित्रपटाचं संगीत करत असतानाच त्यांच्याकडून ही कथा ऐकली, तेव्हा या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music director amara mohile turns producer with a marathi movie a final
First published on: 20-03-2015 at 06:26 IST