सचिन दरेकर दिग्दर्शिक ‘एक थी बेगम’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. सत्यघटनेपासून प्रेरित झालेल्या या सीरिजमध्ये अश्रफ खान उर्फ सपना यांच्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली, विशेष म्हणजे या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री अनुजा साठेच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या सीरिजच्या माध्यमातून तिने एक आव्हानात्मक भूमिका साकारुन स्वत: ला सिद्ध केलं आहे. परंतु कायम सोज्वळ, गुणी अशा भूमिका साकारणाऱ्या अनुजाच्या वाट्याला ही भूमिका कशी आली किंवा तिचीच निवड का करण्यात आली हे दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
‘एक थी बेगम’ या सीरिजची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यापासून अनुजा साठे या नावाला आमची पसंती होती. खरं तर जेव्हा एमएक्सप्लेअरसोबत आम्ही ही सीरिज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमच्यासमोर सपना या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नाव सुचविण्यात आली होती. मात्र आमची पहिली पसंती अनुजालाच होती. विशेष म्हणजे तिच्या नावावर साऱ्यांचं एकमत झालं होतं. त्यामुळे बेगम साकारेल तर अनुजाच अस सगळ्याच एकमत झाल होत, असं सचिन दरेकर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ‘अनुजा एक गुणी, प्रामाणिक आणि प्रयोगशील अभिनेत्री आहे. तिचा अभिनय उत्तम आणि कमालीचा आहे. इतकंच नाही तर जेव्हा आम्ही एक थी बेगमची कथा तिला वाचून दाखवली त्याच क्षणी तिने या भूमिकेसाठी होकार दिला आणि तिचा हाच उत्साह आम्हाला भूमिकेसाठी आवश्यक होता’.
दरम्यान, सचिन दरेकर यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं असून ही सीरिज १४ भागांची आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ती प्रदर्शित होणार आहे. तसंच अनुजा साठेसह अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिरसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदिप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर हे कलाकार या सीरिजमध्ये झळकले आहेत.