छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सयांतनी घोष हिने लॉकडाउनमध्ये विवाहबद्ध होण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून सयांतनी अनुराग तिवारीला डेट करत आहे. कदाचित या लॉकडाउनमध्ये आम्ही ‘व्हर्च्युअली’ लग्नगाठ बांधू, असं ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली.

“मला लग्न करायचे आहे आणि योग्य वेळी ते होईलच. या तारखेलाच लग्न करू असं काही आम्ही ठरवलं नाही. पण जर इच्छा झाली तर या लॉकडाउनमध्येच ‘व्हर्च्युअली’ लग्नगाठ बांधू. पण जेव्हा कधी आम्ही लग्न करू तेव्हा जाहीर नक्की करू”, असं ती म्हणाली.

सयांतनीने २००२ साली ‘कुमकुम : एक प्यारा सा बंधन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. याशिवाय तिने ‘घर एक सपना’, ‘नागिन’, ‘ससुराल सिमर का’ आणि ‘नामकरण’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

पाहा फोटो : स्टारकिड असूनही स्वबळावर स्वत:चं स्थान निर्माण करणारा विराजस कुलकर्णी

सयांतनी नुकतीच ‘नागिन ४ : भाग्य का जहरीला खेल’ या मालिकेत झळकली होती. मात्र या मालिकेत तिच्या भूमिकेला फारसा वाव मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिने लॉकडाउनमुळे आर्थिक चणचण भासत असल्याचाही खुलासा केला होता. “मालिकेतील सर्व कलाकारांचे पगार थकले आहेत. मला घराचे आणि गाडीचे हफ्तेसुद्धा भरायचे आहेत. रोजच्या जीवनातील खर्च वेगळा आहे. ही वेळ लवकरात लवकर संपावी”, अशी आशा तिने व्यक्त केली.