16 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पावसाचा निबंध हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या लघुपटाला रौप्य शंख पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. मुंबईतील फिल्म्स डिव्हीजन येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप वरळीतील नेहरु सेंटरमध्ये पार पडला. या सभागृहात नागराज मंजुळे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिस्तुल्यानंतर नागराज मंजुळे यांचा हा दुसरा लघुपट. पावसाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांनी पावसाचा निबंध या लघुपटातून दिली आहे. “पिस्तुल्या” या लघुपटापासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नागराज मंजुळे यांचे ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ हे चित्रपट प्रचंड गाजले. वास्तववादी विषय निवडून त्यांचे तितकेच वास्तववादी चित्रण भेदकपणे मांडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचा परीघ आणि खोली दोन्ही विस्तारला आहे.

मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध” यातून पावसासोबत येणारे वादळ त्यांनी परिणामकारक दाखवले आहे. सशक्त व्यक्तिरेखा उभ्या करण्यात नागराज मंजुळे यांचा हातखंडा असून तशाच व्यक्तिरेखा या लघुपटातही आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा पहिला लघुपट ‘पिस्तुल्या’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच, ‘पावसाचा निबंध’ या लघुपटालाही सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या आधी अनेक महोत्सवात हा लघुपट दाखवण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjules short film won special award 16th mumbai international film festival scj
First published on: 03-02-2020 at 21:54 IST