‘पिया का घर’, ‘कोई अपना सा’सारख्या हिंदी मालिकांमधून चमकलेली, पण प्रत्येक वेळी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिलेली नारायणी शास्त्री पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर येत आहे. ‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘पिया रंगरेझ’ या मालिकेतून एका डॉनची भूमिका ती साकारणार आहे. ही डॉन आई आहे, आपल्या मुलासाठी वाट्टेल ते करणारी, पण तरुण वयातच नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचं तस्करीचं साम्राज्यही स्वबलावर साकारणारी दबंग बाई आपण साकारत असल्याचे नारायणी अभिमानाने सांगते.
एरव्ही टीव्हीला बायकांचं माध्यम म्हटलं गेलं असलं तरी मखमली साम्राज्यात राहणाऱ्या, उंची साडय़ा आणि दागिने मिरविणाऱ्या बिचाऱ्या नायिकांशिवाय त्यांना फारसं करण्याची संधी मिळत नसल्याचे नारायणी मान्य करते. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका साकारायला मिळाल्याने ती खूप खुशीत असल्याचे सांगते. ‘फिर सुबह होगी’ या मालिकेनंतर तब्बल दीड वर्षांनी ती नवी मालिका करते आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तिने चोखंदळ नजरेने काही मर्यादित मालिका निवडण्याचे ठरविले होते. त्यामुळे भूमिका आणि मालिकेचं कथानक पटलं तरच काम करायचं हे ठरविल्याचं ती सांगते.
मालिका आणि भूमिकेच्या बाबतीत कित्येकदा अभिनेते भरभरून बोलतात, आपण कसं त्या भूमिकेशी साधम्र्य साधतो, आपले व्यक्तिमत्त्व त्या भूमिकेसाठी किती साजेसे आहे हे पटविण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण, नारायणी याबाबतीतही स्पष्टपणे ‘असं काही नसतं’ असं सांगून टाकते. ‘मुळात मालिकेतील पात्रांशी तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात कधीच समानता शोधू शकत नाही. कारण, ही पात्रं एकतर खूप चांगली असतात नाहीतर खूप वाईट असतात. आपण आपल्या आयुष्यात टोकाचे वाईट किंवा चांगले होऊ शकत नाही. आपल्या भावभावना मिश्र आहेत,’ असं ती सांगते. याबद्दल स्वत:चं उदाहरण देताना ‘फिर सुबह होगी’मध्ये आपण खूप बिचारी आई साकारली होती. पण, या मालिकेत मात्र आपण अगदी उलट डॉनची भूमिका साकारत आहोत. प्रत्यक्षात मी या दोन्ही पात्रांसारखी नसल्याचे सांगताना, प्रत्येक कलाकाराला तो साकारत असलेल्या भूमिकेतून वेगळं होणं आलं पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2015 रोजी प्रकाशित
मालिकेतील भूमिकांशी तुम्ही कधीच एकरूप होऊ शकत नाही – नारायणी
‘पिया का घर’, ‘कोई अपना सा’सारख्या हिंदी मालिकांमधून चमकलेली, पण प्रत्येक वेळी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिलेली नारायणी शास्त्री पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर येत आहे.
First published on: 26-04-2015 at 12:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayani shastri on tv serials