‘स्वच्छ भारत मोहिमे’चा पुकारा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलीवूडचा लाडका अभिनेता सलमान खान याला या मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मी लवकरच स्वच्छता मोहिम सुरू करेन, असे आश्वासन देणाऱ्या सलमान खानने चक्क दिवाळीच्या एक दिवस आधी हातात झाडू घेऊन साफसफाई सुरू केली आहे. त्याने ट्विटरवर या मोहिमेची छायाचित्रे टाकल्यानंतर मोदींनीही ट्विटरवर त्याचे कौतुक केले आहे.
‘बीइंग ह्यूमन’ ही सलमानची सामाजिक मोहीम आहे. त्यामुळे इतरवेळी ‘बीइंग ह्यूमन’च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी होणारा सलमान मोदींच्या या आवाहनाला दाद न देता तरच नवल होते. मात्र, नवलाई ही आहे की फारच कमी दिवसांत सलमानने या आवाहनाची पूर्ती सुरू केली आहे. कर्जतमध्ये चित्रपटसृष्टीतील सहकलाकार आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासह सलमानने ही स्वच्छता मोहीम सुरू केली असून त्याची छायाचित्रेही ट्विटरवर टाकली आहेत. ‘मी कर्जतपासून सुरुवात के ली आहे, ही बघा छायाचित्रे,’ अशी पोस्टही त्याने टाकली आहे. अर्थात, त्याच्या या मोहिमपूर्तीकडे ज्यांचे लक्ष जावे अशी त्याची इच्छा होती त्या मोदींनी छायाचित्रे नुसतीच पाहिली नाहीत. तर सलमानमुळे आता जास्तीत जास्त लोक स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करत त्याचे कौतुक केले आहे.
सलमानने आता हे स्वच्छ भारत मोहिमेचे आवाहन त्याचा लाडका मित्र आमिर खान, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासह अझीम प्रेमजी, चंदा कोचर, ओमर अब्दुल्ला, प्रदीप धूत, रजत शर्मा आणि विनीत जैन या समाजातील मान्यवरांकडे सरकवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi praise salman for taking part in clean india campaign
First published on: 24-10-2014 at 01:14 IST