नसिरुद्दीन शाह यांच्याकडून ओम पुरी यांना श्रद्धांजली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मेहनतीची किंमत मी ओमकडून शिकलो. ४६ वर्षांच्या आमच्या मैत्रीत त्याने मला कायम प्रेरणा दिली. आजही सर्वात मोठा अभिनेता कोण, याचे उत्तर ओम पुरी असेच द्यावे लागेल,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केले.

‘ओमच्या जीवनाने काही अनपेक्षित वळणे घेतली. हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकते. पण काही वर्षांपासून तो आनंदी नव्हता,’ असे सांगून शाह यांनी ‘जाने भी दो यारो’ चित्रपटातील ओम पुरी यांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडचे ‘मैं इतनी क्यूं पी लेता हूँ’ हे वाक्य उद्धृत केले आणि ते पुरी यांच्या आठवणींनी भावनाविवश झाले. एके काळी ‘एफटीआयआय’मध्येही ‘सिनेमॅटिक फेस’ नाही म्हणून हिणवला गेलेला पुरी यांचा चेहरा खरे तर ‘लँडस्केप’ होता, असेही ते म्हणाले.

‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तील ‘पिफ बझार’मध्ये नसिरुद्दीन शाह यांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. पटकथा लेखक अनिल झणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. शाह म्हणाले, ‘‘मी ज्या चित्रपटात काम केले त्यातील बऱ्याच चित्रपटात ओम सुद्धा आहे. ‘भूमिका’, ‘स्पर्श’ अशा चित्रपटांत तर त्याच्या व्यक्तिरेखा खूप लहान आहेत. पण तो त्यासाठी नेहमी तयार असे. त्याला अजिबात अहंकार नव्हता. त्याने सत्यजीत रे यांच्याबरोबर काम केले. मला ते करायला मिळाले नाही, म्हणून मला त्याचा हेवा वाटतो. अभिनेते सौमित्र चटर्जी यांच्याप्रमाणे ओमच्या व्यक्तिमत्त्वातही एक सौम्य तीव्रता होती. रे यांना ती आवडत असे. पण त्याच्याकडे कणखरपणाही होता. ‘अर्धसत्य’सारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला. मला त्याच्या आवाजाचाही फार हेवा वाटे आणि माझे इंग्लिश चांगले आहे, याचा त्याला हेवा वाटे. ओमने एका चित्रपटात पाकिस्तानचे माजी अध्यक्ष ‘झिया उल हक’ यांची भूमिका साकारली. तसाच तो भूमीहारा शेतकरी, मूक आदिवासी, प्रेमळ बाप अशा वेगवेगळ्या भूमिका साकारत होता. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेऊन ते अभिनयातून उलगडण्याचे कसब त्याच्यात होते.’’

आठवणी उलगडल्या

‘मकबूल’, ‘जाने भी दो यारो’ अशा विविध चित्रपटांच्या आठवणी शाह यांनी उलगडल्या. ‘ईस्ट इज ईस्ट’ हा ओम पुरी यांच्या आपल्याला आवडणाऱ्या चित्रपटांमधील एक असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या चित्रपटात ओमने एका पाकिस्तानी व्यक्तीची भूमिका साकारली. पाकिस्तानी क्रिकेटर्स इंग्लिश बोलताना ज्या लहेजात बोलतात तो ओमने त्या चित्रपटात अचूक पकडला होता. म्हणूनच कदाचित पाकिस्तानी प्रेक्षकांनाही ती भूमिका आवडली असावी.’’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naseeruddin shah pays tribute to om puri
First published on: 17-01-2017 at 03:03 IST