‘परदे में रहने दो परदा ना उठाओ…’ या गाण्यातील अदाकारीने लाखो चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आशा पारेख यांनी आयुष्यातील पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आशा पारेख यांचे ‘द हिट गर्ल’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. त्यांच्या या आत्मचरित्रात निर्माते नासिर हुसैन यांच्याविषयीच्या नात्याचा उल्लेख करण्यात करण्यात आल्याचे दिसून येते.

आत्मचरित्राच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रेमाविषयी त्या म्हणाल्या की, नासिर साहेब या एकमेव पुरुषावर मी प्रेम केलं. त्यामुळे आत्मचरित्रात त्यांचा उल्लेख महत्त्वाचा होता. माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचा आत्मचरित्रात उल्लेख टाळला असता तर आत्मचरित्राला काही अर्थच उरला नसता. आशा पारेख यांनी १९५९ मध्ये नासिर यांच्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय त्यांनी ‘कारवा’ आणि ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत काम केले. या काळात निर्माते नासिर हुसैन आणि आशा पारेख यांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रेमाच्या आठवणींना उजाळा देऊन आशाजी थांबल्या नाहीत. तर त्यांनी नासिर यांच्यासोबत लग्न न करण्याचे कारण देखील सांगितले.

आशा म्हणाल्या की, ‘एखाद्याचा संसार उदध्वस्त करणे माझ्या स्वभावात नाही. नासिर यांनी त्यांच्या कुटुंबियाला वाऱ्यावर सोडावे, असे कधीच वाटले नाही. त्यामुळेच मी त्यांच्यासोबत लग्नाचा विचार केला नाही.’ हे सांगत असताना आशा यांनी नासिर यांच्या कुटुंबियांसोबतचे संबंध सलोख्याचे असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे आशाजींचा बॉलिवूड प्रवास उलगडणाऱ्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी नासिर यांची मुलगी नुसरत आणि त्यांची नात उपस्थित होत्या. नासिर यांच्या कुटूंबातील सदस्य आत्मचरित्राच्या प्रकाशनाला आल्यामुळे खूप आनंददायी होते, असेही त्या म्हणाल्या.