६४व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘कासव’ने Kaasav बाजी मारली होती. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘कासव’ या चित्रपटाला सुवर्णकमळाने सन्मानित करण्यात आलेले. हिंदी-प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना या राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीत मागे टाकून ‘कासव’ चित्रपटाने हा सर्वोच्च सन्मान जिंकला असला तरीही आता रीतसर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन तिकीटबारीवरचे आर्थिक यश साधणारी शर्यत या चित्रपटाला जिंकता येईल का? असा प्रश्न उभा राहिला आहे. ‘कासव’चे चित्रीकरण पूर्ण होऊन आठ महिने उलटूनही अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. वितरक न मिळाल्याने या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.
वाचा : …आणि रजनीकांत अमृता फडणवीसांना भेटले
जवळपास दीड कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या कथेची कल्पना २०१५मध्ये सर्वांसमोर आली. २०१६ मध्ये चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि गेल्याच वर्षी सप्टेंबरमध्ये संपूर्ण काम पूर्ण झाले. या चित्रपटाचे निर्माता डॉ. मोहन आगाशे सध्या लंडनमध्ये असून त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘आम्ही अजूनही वितरकांच्या शोधात आहोत. झी फिल्म्सने चित्रपटाच्या वितरणात रुची दाखवली असून, त्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. पण, यातून काही सार्थ होईल का हे सांगता येत नाही.’ ‘कासव’मध्ये मोहश आगाशे यांचीही भूमिका आहे. ‘कासव’ला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळाला आहेच पण त्याव्यतिरीक्त ‘मामी’ चित्रपट महोत्सव (ऑक्टोबर २०१६), कोलकाता (नोव्हेंबर २०१६), थिरुवनंतपुरम (डिसेंबर २०१६), बंगळुरु (जानेवारी २०१७) आणि न्यू यॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्येही (एप्रिल २०१७) याची अधिकृत निवड करण्यात आली होती.
वाचा : अखेर शिवगामीच्या व्यक्तिरेखेबद्दल श्रीदेवी बोलली
सध्याच्या जागतिकीकरण, स्पर्धेच्या युगात सततच्या तणावामुळे नैराश्याच्या गत्रेत जाणाऱ्यांचे प्रमाण विलक्षणरीत्या वाढीस लागले आहे. दररोज आत्महत्यांसारखे विषय वर्तमानपत्रांच्या मथळ्यात प्रकर्षांने दिसत आहेत. अशा परिस्थितीत या समस्येचे दीर्घकालीन उत्तर शोधण्याची गरज आहे आणि या गरजेच्या ऊर्मीतूनच ‘कासव’ चित्रपट जन्माला आला आहे.
 
  
  
  
  
  
 