scorecardresearch

ना टय़ रं ग : ‘लव्ह यू’ प्रेम म्हणजे नक्की काय असतं?

अन्य सजीवांमध्ये प्रेमाचा काहीसा अंश आढळून येत असला तरी मेंदूने प्रगत झालेल्या मानवात प्रेमाच्या अगणित तऱ्हा आढळून येतात.

ना टय़ रं ग : ‘लव्ह यू’ प्रेम म्हणजे नक्की काय असतं?
ना टय़ रं ग : ‘लव्ह यू’ प्रेम म्हणजे नक्की काय असतं?

रवींद्र पाथरे

मानवाच्या पृथ्वीतलावरील जन्मापासून आजपर्यंत चिरंतन टिकून राहिलेला विषय म्हणजे.. प्रेम! अन्य सजीवांमध्ये प्रेमाचा काहीसा अंश आढळून येत असला तरी मेंदूने प्रगत झालेल्या मानवात प्रेमाच्या अगणित तऱ्हा आढळून येतात. कालौघात त्याबद्दलचं संशोधनात्मक विवेचन, विश्लेषण करणारं साहित्य, कला, मानसशास्त्र विकसित होत गेलं. तरीदेखील आजही प्रेमाच्या अज्ञात पैलूंचा शोध सर्जनशील कलावंत आपापल्या कलाकृतींतून घेताना दिसतात. जर्मन लेखक क्रिस्तो सागोर लिखित ‘लव्ह यू’ हे नाटकही असंच प्रेमाच्या शोधात लिहिलं गेलं आहे. त्याचं मराठी रूप ‘तमाशा थिएटर’ या संस्थेनं नुकतंच सादर केलं. मृण्मयी शिवापूरकर भाषांतरित हे नाटक सपन सारन यांनी दिग्दर्शित केलं आहे. नाटक आणि अभिवाचन यांचं बेमालूम मिश्रण या रंगप्रस्तुतीसाठी वापरलं गेलं आहे. तथापि, आपण ‘लव्ह यू’चा प्रत्यक्ष प्रयोगच पाहतो आहोत की काय असं वाटावं इतका हा रंगाविष्कार सशक्त आहे.

ज्याने कधीच प्रेम केलेलं नाही किंवा ज्याच्या आयुष्यात प्रेमच आलेलं नाही अशी व्यक्ती सहसा विरळाच. कदाचित त्याचं स्वरूप व्यक्तीगणिक वेगवेगळं असू शकतं. प्रेम, शारीर/ अशारीर आकर्षण, आपुलकी, जिव्हाळा, माया, ओढ, असोशी अशा त्याच्या नाना तऱ्हा आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतात. व्यक्तिपरत्वे या भावनेला प्रतिसाद देण्याची पद्धतही भिन्न भिन्न आढळते. बरं, प्रेम नावाची ही भावना कायमस्वरूपी टिकते का? की देश-काल-परिस्थितीनुरूप ती हळूहळू वा थोडय़ाच कालावधीत विरत जाते? ती स्थायी असते की अस्थायी? प्रेमविवाह केलेल्या व्यक्तीही कालांतराने एकमेकांना विटून वेगळ्या झालेल्या दिसतात; किंवा मग दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेल्या दिसतात. कधी कधी अशी व्यक्ती अनेक व्यक्तींच्या प्रेमात पडलेली दिसते. याचा अर्थ आधीच्या व्यक्तीवर त्या माणसाचं प्रेम नसतं? की ते आटलेलं असतं? एकाच वेळी अनेकांच्या प्रेमात पडलेली माणसंही आढळतात. अशांच्या बाबतीत काय म्हणायचं? त्यांचं हे प्रेम खरं असतं, की त्यांच्या लेखी हा एक रोखठोक व्यवहार असतो? की त्यांची ती नैसर्गिक वृत्ती असते? काहींचं प्रेम कायम अव्यक्तच राहतं. क्वचित कधी ते मुखर झालंच, तर त्यातली तीव्रता इतरांना जाणवते. काहींचं प्रेम अनाम राहू इच्छितं. प्रेम करणारी माणसं काही वेळा आयुष्यभर एकत्र राहिली की एकमेकांना कंटाळलेली दिसतात. तर काहींचं प्रेम काळाबरोबर सायीसारखं घट्ट झालेलं जाणवतं. परस्परांत प्रेम नसूनही काही माणसं भांडत तंडत का होईना, एकत्र राहतात. ती का? त्याला व्यावहारिक कारणं असतात, की त्यांचं प्रेमच त्यांना एकत्र बांधून ठेवतं? काही जण क्षणिक रागाच्या भरात एकमेकांपासून दूर जातात.. कायमसाठी!

मग यातलं खरं काय? प्रेम असं काही असतं की नसतंच मुळी? एकेकाळी परस्परांवर असलेलं प्रेम पुढे टिकत नाही. मग अशा व्यक्ती परस्परांपासून अलिप्त होत जातात. हे केवळ व्यक्तींच्या बाबतीतच नव्हे, तर माणसांच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टीबद्दल हे प्रत्ययाला येतं. त्यातही प्रेमाच्या अगणित तऱ्हा व छटा अनुभवास येतात. ‘लव्ह यू’ आणि ‘आय लव्ह यू’ या म्हणण्यातही प्रेमभावनेच्या प्रकटीकरणातील मोठा भेद दिसून येतो. त्यामुळे प्रेम म्हणजे नक्की काय असतं, हा प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी पडत असतोच. 

‘लव्ह यू’ नाटकात या सगळ्याची चर्चा दोन किशोरवयीन मुलांच्यात घडताना दिसते. अकरा वर्षांची लिया आणि बारा वर्षांचा युलियान यांना प्रेम या विषयाबद्दल जबर कुतूहल आहे. ते दोघं त्याबद्दल सतत बोलतात. खरं तर त्यांना आपलं एकमेकांवर प्रेम आहे का, हेही जाणून घ्यायचं असतं. त्यातून त्यांच्यात जो संवाद होतो, तो म्हणजे हे नाटक! लियाच्या आई-वडलांत तीव्र मतभेद, भांडणं, ताणतणाव असल्याचं तिला जाणवलेलं असतं. पण ते लियासमोर वा अन्य कुणाही समोर सहसा प्रकट होणार नाही याची दक्षता दोघंही घेतात. तर युलियानचे आई-वडील थेट घटस्फोटाच्या पायरीवरच उभे ठाकले आहेत. त्यामुळे युलियान अस्वस्थ, बेचैन आहे. लियाचे वयस्क आजी-आजोबा मात्र प्रेमभरलं सहजीवन जगताना त्यांना दिसतात. अडनिडय़ा वयातल्या लिया आणि युलियानला म्हणूनच प्रेम म्हणजे नक्की काय असतं, हे जाणून घ्यायचं आहे. पण ते आपल्या आई-वडलांकडून समजावून घेणं शक्य नाहीए हेही ते जाणून आहेत. म्हणून ते अधूनमधून लियाच्या आजी-आजोबांच्या भेटीला जातात. त्यांच्याकडून प्रेमाबद्दल जाणून घेऊ इच्छितात. पण तेही लिया-युलियानला प्रेमासंदर्भात सुस्पष्ट मार्गदर्शक उत्तरं देऊ शकत नाहीत. परंतु त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जे व्यक्त होतं तेच ज्याला लोक प्रेम म्हणतात ते आहे का, असं दोघांना वाटतं.

तसं तर दोघं आपापल्या आवडीच्या गोष्टींबद्दलही एकमेकांशी नित्य बोलत असतात. त्या गोष्टींची आवड कालांतराने मागे पडलेली त्यांना जाणवते. प्रेमाचंही असंच होतं का?.. त्यांना प्रश्न पडतो. मग आपलं काय? आपलं एकमेकांवर प्रेम आहे? आणि असलं, तर कशा प्रकारचं आहे? या प्रेमाचं भवितव्य काय?

प्रश्न.. प्रश्न.. आणि प्रश्न..!

या प्रश्नांच्या उत्तरांचा अथक शोध म्हणजे हे नाटक होय. ‘लव्ह यू’ हा मूळ जर्मन नाटकाचा स्वैर अनुवाद आहे. त्यातील पात्रांची नावं जर्मनच ठेवल्याने हे विशेषत्वानं जाणवतं. बाकी मग प्रेम ही भावना सार्वत्रिक असल्याने त्यातले संदर्भ वैश्विक असणं ओघानं आलंच. लेखिका मृण्मयी शिवापूरकर यांनी मूळ नाटकाचं यथातथ्य रूपांतर केलेलं आहे. त्यामुळे ते जर्मनीत घडतंय हे प्रेक्षकाच्या मनावर ठसतं. तरीही पौगंडावस्थेतील संवेदनशील मुलांच्या मनातल्या भावभावना त्यातून ताकदीनं प्रकट होताना दिसतात. नाटक दोनच पात्रांपुरतं सीमित ठेवल्याने लिया आणि युलियान यांना अनेक भूमिका एकाच वेळी कराव्या लागल्या आहेत. दिग्दर्शिका सपन सारन यांनी एकमेकांत गुंतलेले घटना-प्रसंग संवादभाषा आणि तिचं उच्चारण, तसंच रंगमंचीय व्यवहार यांच्या चपखल योजनेतून प्रत्ययकारी केले आहेत. पर्ण पेठे (लिया) आणि शिवराज वायचळ (युलियान) यांनी ते तितक्याच ताकदीनं आविष्कारित केले आहेत. त्यामुळे प्रयोगही तितकाच खिळवून ठेवणारा होतो. विशेषत: वय आणि व्यक्तीपरत्वे होणारे भाषिक बदल पर्ण पेठे यांनी मोठय़ा नजाकतीनं पेलले आहेत. हे किशोरवयीन मुलांचं भावविश्व प्रकट करणारं नाटक आहे याचं भान दिग्दर्शिकेनं जराही सुटू दिलेलं नाही. त्यामुळे त्यांची भावाभिव्यक्ती तशीच ‘रॉ’ दाखवली आहे. तरुणाईचा फ्रेशनेस या प्रयोगात आहे. त्याचा गहिरा परिणाम सतत जाणवत राहतो. नेहमीच्या सामाजिक, कौटुंबिक नाटकांच्या घिशापिटय़ा हाताळणीपेक्षा अगदी वेगळी ही हाताळणी आहे. ती समजून घेत हा रंगाविष्कार आस्वादायला हवा. प्रेक्षक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. बाकी तांत्रिक बाबीही प्रयोगपूरक! एक आगळं नाटक पाहायची चूस हे नाटक पुरं करतं, यात शंका नाही.  

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या