रत्नाकर मतकरींनी आपल्या कारकीर्दीत विपुल लेखन केलेलं आहे. कथा, कादंबऱ्या, नाटकं, नभोनाट्य, चित्रपटकथा, मालिकालेखन, स्तंभलेखन, वैचारिक लेखन… आणि त्या त्या साहित्यप्रकारांत त्यांनी आपली स्वतःची नाममुद्राही उमटविली आहे. गूढकथा हा त्यांनी हाताळलेला आणखी एक सशक्त प्रकार. गूढकथेचे वाचक तसे संख्येनं खूप कमी. त्यामुळे त्या आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात रुजल्या नाहीत. तरीही त्यातदेखील मतकरींचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यांच्या गूढकथांची नाट्यरूपांतरंही झाली आहेत. तोच धागा पकडून दिग्दर्शक विजय केंकरे यांनी आता त्यांच्या दोन कथा नाट्यरूपात रंगमंचावर सादर केल्या आहेत… ‘शsss… घाबरायचं नाही’ या शीर्षकाखाली! यापूर्वीही अनेक लेखकांच्या कथांची नाट्यरूपं रंगभूमीवर सादर झालेली आहेत. ‘तुम्हारी अमृता’वरून ‘प्रेमपत्र’, ‘इंदू काळे सरला भोळे’, ‘बारोमास’… आता त्यांत ही आणखी एक नवीन भर पडली आहे. कथावाचन वा कथन आणि तिचं प्रत्यक्ष नाट्यात्म सादरीकरण असा दुपेडी हा प्रकार आहे. या नाट्यानुभवात दोन कथा सादर होतात… ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ.’

‘पावसातला पाहुणा’ ही पुराणकथा म्हणता येईल या प्रकारातली आहे. गावाबाहेरच्या एका निर्जन परिसरातील एका वाड्यात हरीनाथ हा वृद्धत्वाकडे झुकलेला गृहस्थ आणि त्याची तरुण पत्नी निरांजनी हे राहत असतात. एका पावसाळ्या संध्याकाळी एक तरुण अनाहुत पाहुणा पावसापासून बचाव करण्यासाठी म्हणून त्या वाड्याचा आसरा घेतो. त्याच्या मर्दानी रूपावर पाहताक्षणीच निरांजनी भाळते. हरीनाथनाही निरांजनी त्या तरुणावर मोहित झालीय हे तत्काळ जाणवतं. तो पाहुणाही काहीशा या विजोड जोडप्याला पाहून दुग्ध्यात पडतो. तोदेखील रूपगर्विता निरांजनीकडे स्वाभाविकपणेच आकर्षिला गेलेला असतो. तो एक पुुराणवस्तू संशोधक असतो. वाड्यापासून दूरवर असलेल्या कालदुर्ग नावाच्या किल्ल्यातील संशोधनासाठी तो आलेला असतो. त्या किल्ल्यातील राजा कालदमन याची कहाणी तो त्या दोघांना ऐकवतो. कालदमनला एक गूढ विद्या वश असते… तारुण्य प्राप्त करण्याची. त्या कहाणीला काहीसं समांतर याही तिघांचं आयुष्य आपल्याला पुढे जाणवतं. या कहाणीत पुढे काय घडतं हे प्रत्यक्ष पाहणंच योग्य.

दुसरी कथा… ‘जेवणावळ.’ एका घरात काहीतरी धार्मिक कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. त्याकरता भरपूूर पाहुणे मंडळी आलीयत. अग्निकुंड रसरसतंय. त्यात समीधा टाकल्या जाताहेत. पाहुणे मंडळींना एव्हाना खूप भुकाही लागल्या आहेत. पण तरी अजून जेवणाचा पत्ता नाहीए. इतक्यात एक भुकेजलेला युवक तिथं येऊन पोहोचतो. तो यजमानांना आपल्याला खूप भूक लागलीय असं सांगतो. यजमान त्याला जेऊ घालण्याचं आश्वासन देतात. तो कुठून आलाय, काय करतो वगैरे चौकशी करतात. तो आपण नोकरीनिमित्त एका गावात गेलो होतो. तिथे एका खाणावळीत जेवायला गेलो असता त्या खाणावळवालीचा आलेला भयाण अनुभव तो त्यांना कथन करतो. तिथून कसेबसे पळून आपण आल्याचं तो सांगतो. त्याचं हे कथन ऐकताच यजमान आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना जेवण सुरू करण्यास फर्मावतात. आणि सगळी भुकेजलेली मंडळी त्या तरुणावर तुटून पडतात…

या दोन्ही कथांची पिंडप्रकृती परस्परभिन्न आहे. त्यांत रहस्य आणि गूढता मात्र ठासून भरलेली आहे. कथेतील पात्रं कथा सांगता सांगता प्रत्यक्ष मंचावर अवतरतात. ती मध्ये मध्ये सूत्रधाराच्या रूपात कथाकथन करतात आणि त्या कथेतलं ‘नाट्य’ही त्या ओघात प्रत्यक्षात साकारतात. हरीनाथ, निरांजनी, संशोधक पाहुणा, राजा कालदमन, सरदार श्रीमणी आणि त्याची पत्नी ही पात्रं कथेच्या प्रवासात सदेह मंचावर अवतरतात. आणि कथा कथन करता करता ती कधी प्रत्यक्षरूप घेते हे आपल्यालाही कळत नाही… इतके आपण तिच्याशी तोवर एकरूप झालेलो असतो. तीच गोष्ट ‘जेवणावळ’ची. त्यातली पात्रं कथा कथन करता करता अक्षरशः समूर्त होतात आणि आपण त्या झंझावाती अनुभवात भिरभिरायला लागतो… अंगावर अक्षरशः काटा येतो.

या दोन्ही कथांचं सादरीकरण आपल्याला शब्दशः खिळवून ठेवतं. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्याचं कथारूप आणि प्रत्यक्ष सादरीकरण याचा असा काही मेळ घातलाय की तो तुम्हाला खुर्चीला बांधूनच ठेवतो. हे संमिश्रण त्यांनी इतक्या लीलया घडवलं आहे की तो एक संपूर्ण नाट्यानुभव आपल्याला देतो. कथेतल्या प्रत्येक पात्राला त्याचं त्याचं असं अंतरंग त्यांनी बहाल केलंय. त्या पात्रांचं असणं, वावरणं, हालचाली, हावभाव यांतून ती सर्वांगानं मंचित होतात. आणि आपण क्षणकाल कथा ‘ऐकतो’ आहोत हेच विसरायला होतं. ती जणू प्रत्यक्षात आपल्यासमोर ‘घडते.’ ही किमया आहे दिग्दर्शकीय कौशल्य आणि ताकदीच्या कलावंतांची!

पहिल्या ‘पावसातला पाहुणा’ या कथेत डाॅ. गिरीश ओक हे सूत्रधार, हरीनाथ आणि सरदार श्रीमणी अशा तिहेरी अवतारात प्रत्येक पात्राचा वेगळा चेहरा घेऊन येतात. निरांजनी आणि सरदार पत्नी झालेल्या डाॅ. श्वेता पेंडसे यांनी तिचं मदालसा रूप आपल्या ‘असण्यातून’ आणि विविध भावविभ्रमांतून उत्कटतेेनं आकारलं आहे. पुष्कर श्रोत्री सूत्रधार तसेच तरुण संशोधक आणि कालदमनच्या रूपात कथेतील गूढतेत भर घालतात.

दुसऱ्या ‘जेवणावळ’ या कथेत यजमान आणि कथावाचक झालेले डाॅ. गिरीश ओक सुरुवातीपासूनच मंत्रभारलं वातावरण तयार करतात. तरुण याचकाच्या भूमिकेत पुष्कर श्रोत्री कथनकार आणि ‘तो’ तरुण अशा रूपांत या फ्लॅशबॅक तंत्रातील कहाणीचे अविभाज्य भाग होतात. विशेषतः नाट्यात्म भागात ते कमालीचे एकरूप झाले आहेत. ते आपल्याबरोबर प्रेक्षकांनाही त्या कहाणीत फरफटत घेऊन जातात. या कथेत यजमानाची पत्नी आणि खाणावळवाली झालेल्या डाॅ. श्वेता पेंडसे अगदी वेगळ्याच रूपांत सामोऱ्या येतात. त्यांनी या भूमिकेत आवाजासह हावभाव, वागणं-बोलणं यांत कमालीचे बदल केले आहेत… अगदी ओळखू न येण्याइतपत. त्यांच्या कारकीर्दीतील ही एक संस्मरणीय भूमिका ठरावी.

नीरज शिरवईकर यांनी यातील सांकेतिक नेपथ्य उभं केलं आहे. दोन्ही कथांत वाड्याचा पार्श्वभागातील भव्य दरवाजा मोठीच भूमिका बजावतो. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना गूढ वातावरणनिर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचलते. तीच गोष्ट अजित परब यांच्या पार्श्वसंगीताची. भा. रा. तांबे आणि विंदा करंदीकर यांच्या कवितांचा चपखल वापर त्यांनी केला आहे. सुशील स्वामी यांनी याची रंगावृत्ती तयार केली आहे. मंगल केंकरे यांनी कथानुरूप पात्रांना यथोचित वेशभूषा केली आहे. सोनिया परचुरे यांच्या नृत्यआरेखनाने निरांजनी या पात्राला रूपयौवनेची ग्रेस बहाल केली आहे.

एक देखणे, खिळवून ठेवणारे गूढनाट्य पाहिल्याचा प्रत्यय हा रंगाविष्कार नक्कीच देतो.