‘हिलिंग इज ब्युटीफूल’ या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा आशयावर आधारित ‘जून’ ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबफिल्मच्या प्रदर्शनाबाबत सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी ‘जून’मधील चार सुमधुर गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.

वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्यांना निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी यांनी शब्दबद्ध केले असून आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या शाल्मली हिने या गाण्यांना संगीत दिले आहे. ‘जून’च्या निमित्ताने शाल्मली संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे. त्यामुळे अशी दमदार आणि सृजनशील टीम ‘जून’ला लाभल्याने यंदा पावसाळ्यातील आल्हाददायी वातावरणाचा आनंद द्विगुणित होणार हे नक्की!

आणखी वाचा : कपूर कुटुंबीयांनी आईकडे पाठ फिरवली होती, करीना कपूरचा खुलासा

निखिल महाजन लिखित ‘बाबा’ या भावनिक गाण्याला शाल्मली, अभय जोधपूरकर यांचा आवाज लाभला असून ‘बाबा’ हे गाणे आनंदी जोशी हिने गायले आहे. ‘हा वारा’ हे प्रेरणादायी गाणे शाल्मली आणि जितेंद्र जोशी यांनी गायले असून ‘पार गेली’ या आनंददायी गाण्याला असीम धनेश्वर आणि नेहा तावडे यांनी स्वरबद्ध केले आहे. तर या दोन्ही गाण्यांचे बोल जितेंद्र जोशी यांचे आहेत. या सर्व गाण्यांना शाल्मली हिने संगीत दिले आहे.

 

‘जून’ या चित्रपटात नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.