Neha Sing Rathore : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लागू केलं आहे. आयात शुल्क त्यामुळे आता ५० टक्के झालं आहे. ज्याचा फटका भारतातल्या विविध क्षेत्रांना बसणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली गायिका नेहा सिंग राठोडने या प्रकरणाबाबत भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे.
काय म्हटलंय नेहा सिंग राठोडने?
नेहा सिंग राठोडने एका मागोमाग एक पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशावर कसं ५० टक्के टॅरिफ लादलं असा प्रश्न विचारला आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे कमकुवत पंतप्रधान आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना आव्हान देत आहेत त्यांनी नरेंद्र मोदींची ती नस दाबली आहे ज्याला अदाणी असं म्हणतात असं म्हणतात. पुढे आपल्या ट्वीटमध्ये नेहा म्हणते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा. तर त्यापुढे केलेल्या पोस्टमध्ये नेहा म्हणते देश झुकाने आए थे, नाक कटा कर जाएंगे. शिवाय डोनाल्ड ट्रम्प, टॅरिफ, नरेंद्र मोदी यांचे हॅशटॅगही नेहाने पोस्ट केले आहेत. नेहाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध कमेंट केल्या आहेत.
नेहाच्या पोस्टबाबत नेटकरी काय म्हणत आहेत?
नेहा सिंह राठोडच्या पोस्टनंतर तिला ट्रोल केलं जातं आहे. अभिषेक नावाचा युजर म्हणतो काँग्रेसने तुझी कोणती नस दाबली आहे? तुझा अजेंडा काँग्रेसच्या बाजूनेच कसा असतो? अर्शित नावाचा युजर म्हणतो डोनाल्ड ट्रम्प फक्त टॅरिफ वाढवत नाहीयेत. तर आपल्या आत्मसन्मानाला आव्हान देत आहेत. मोदी आणि अदाणी यांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत ट्रम्प यांनी त्याच व्यावसायिक हितसंबंधांना लक्ष्य केलं आहे ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आहे असंही या युजरने म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती आणि आता अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्यात आले आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले होते की, ते पुढील २४ तासांत भारतावरील टॅरिफ वाढवतील. आता ट्रम्प यांनी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर भारताने प्रत्युत्तर दिले तर टॅरिफ आणखी वाढवले जाईल. ट्रम्प यांच्या आदेशानुसार, हा टॅरिफ दोन टप्प्यांत लागू केला जाईल. पहिल्या टप्प्यात, उद्यापासून म्हणजेच ७ ऑगस्टपासून २५ टक्के कर लागू केला जाईल, तर दुसरा टप्पा २७ ऑगस्टपासून लागू केला जाईल.