‘अगं आज घरकाम करणाऱ्या बाई आल्याच नाहीत, माझं संपूर्ण दिवसाचं वेळापत्रकच कोलमडलं… खरंच गं माझ्या घरकाम करणाऱ्या मावशी आहेत म्हणून तर ऑफिसची कामं मी निश्चिंत मनाने करु शकते,’ हे आणि असे अनेक संवाद आपल्या नेहमी कानावर पडत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्याने आयुष्य जितकं सुखकर होतं तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. कधी ती असते ताई, कधी मावशी, कधी काकू तर कधी नुसतीच बाई. कुटुंबातली सदस्य नसली तरी कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. १८ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारं हृदयस्पर्शी नातं या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे अश्या स्त्रियांची ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. आपल्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे मोठे प्रसंग ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आठवतील. उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेविषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘मोलकरीण बाई या मालिकेतून खूप महत्त्वाचा विषय हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. घरकाम करणारी बाई ही आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. म्हणूनच तर त्यांना आपण सपोर्ट सिस्टीम म्हणतो. याच मंडळींच्या आयुष्यात डोकावणारी ही मालिका असेल. मोलकरीण बाई या मालिकेची गोष्ट त्या तमाम स्त्रियांना अर्पण आहे ज्या कोणत्याही परिस्थीतीवर मात करत हसतमुखाने आपली काम चोख बजावतात.’