‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास लग्न कधी करणार आणि केल्यास त्याची साथीदार कोण असणार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. ‘बाहुबली’ या चित्रपटापासूनच प्रभास व त्याची सहकलाकार अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. तर या दोघांनी ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत’ असे सांगत चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्रभासशी लग्न करण्यास एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री उत्सुक असल्याचं दिसत आहे. एका चॅट शोदरम्यान तिने आपली इच्छा बोलून दाखवली.
‘फीट अप विथ द स्टार्स’ या कार्यक्रमात अभिनेत्री काजल अग्रवालने हजेरी लावली होती. यावेळी काजलने तिच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. लग्नाविषयी विचारलं असता ती म्हणाली, ”होय, मी लवकरच लग्न करणार आहे.” कार्यक्रमाची सूत्रसंचालक लक्ष्मी मंचू हिने काजलला तीन प्रश्न विचारले. ‘किल, हुक अप आणि मॅरी’ या तीन गोष्टी तू कोणत्या तीन अभिनेत्यांसोबत करशील असं तिने विचारलं. यावर काजल म्हणाली, ”राम चरण- कील, ज्युनिअर एनटीआर- हुक अप आणि प्रभासशी लग्न करेन.”
आणखी वाचा : मुंबईच्या बैठ्या चाळीतला हा चिमुकला आता बनलाय मराठीतला पहिला ॲक्शन-डान्सिंग स्टार
भावी साथीदाराकडून तुला कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत असा प्रश्न विचारला असता ती पुढे म्हणाली, ”तसं तर बऱ्याच गोष्टी अपेक्षित आहेत. पण किमान तो आध्यात्मिक, काळजी घेणारा आणि थोडाफार पझेसिव्ह असावा. मी स्वत: फार आध्यात्मिक आहे. माझ्या बॅगमध्ये मी कायम शंकराची छोटी मूर्ती ठेवते. मी जिथेही जाते, तिथे ती मूर्ती माझ्यासोबत असते.”