मुलगा नसल्याची कोणतीही खंत मला नाही. माझी मुलगी माझ्यासाठी सर्वकाही असून ती दहा हजार मुलांना तोडीस तोड उत्तर देऊ शकते आणि ही गोष्ट मी गर्वाने सांगू शकतो असे प्रतिपादन अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी ठाणे येथे केले.
आमदार एकनाथ शिंदे यांच्या वतीने केवळ एकच मुलगी असणाऱ्या पालकांना सन्मानित करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पिळगावकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
रविवारी सायंकाळी महापालिकेच्या किसननगर येथील शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केवळ एकच मुलगी असणाऱ्या २५ जोडप्यांचा पिळगावकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
येत्या गुरुवारी सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. याच  दिवशी पिळगावकर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘एकुलती एक’ या चित्रपटातून त्यांची मुलगी श्रिया  चित्रपटसृष्टीत पर्दापण करत आहे. यानिमित्त सदर कार्यक्रमात दिग्दर्शक विजू माने यांनी दोघांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी किरण नाकती संचालित अभिनय कट्टय़ावरील कलारांनी पिळगावकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.