ओडिया सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेते अजित दास यांचं निधन झालं आहे. ते ७१ वर्षांचे होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार एक सप्टेंबर रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप जाहीर केलेलं नाही. दरम्यान अजित दास यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अजित दास एक लोकप्रिय अभिनेता होते. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाचं प्रदर्शन केलं होतं. १७७६ साली सिंदुरा बिंदू या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनंतर मा, इश्क पुनी तारे, आमा घर आमा संसार, गोलामगिरी यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. अभिनयासोबतच ते दिग्दर्शनातही कार्यरत होते. अजित दास यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

करोनाचा कहर सुरूच; रुग्णांची संख्या ४८ लाखांच्या पुढे

भारतात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात करोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे. महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात असून एकूण मृत्यूपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील करोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी करोनावर मात केली आहे.