वर्षांला एक चित्रपट आणि ‘सत्यमेव जयते’

आमिर खान मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांना दिसला तो ‘धूम ३’ चित्रपटाच्या निमित्ताने. आत्ता वर्षभरानंतर पुन्हा डिसेंबर महिन्यात तो दिसणार आहे

आमिर खान मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांना दिसला तो ‘धूम ३’ चित्रपटाच्या निमित्ताने. आत्ता वर्षभरानंतर पुन्हा डिसेंबर महिन्यात तो दिसणार आहे ‘पीके’ चित्रपटातला ‘थार्की छोकरा’ म्हणून.. त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारायच्या तर ‘पीके’चाच विषय निघणार. पण, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ना त्याच्या चित्रपटांच्या प्रेक्षकांची एवढी काळजी आहे की, ‘पीके’ची कथा सांगितली तर तुम्हाला चित्रपट बघताना मजा येणार नाही, असे तो म्हणतो. म्हणजेच ‘पीके’ सोडून सगळ्या गोष्टींवर बोलायला तो तयार असतो. सध्या त्याचे आघाडीचे सहकलाकार आपापल्या चित्रपटांचे व्यग्र वेळापत्रक सांभाळून कबड्डी, फुटबॉल आणि क्रिकेटचे संघ खेळवण्यात दंग आहेत. आमिर मात्र मला वर्षांकाठी एक चित्रपट आणि ‘सत्यमेव जयते’ या पलिकडे जायचे नाही, असं ठामपणे सांगतो.
‘मला खेळ खूप आवडतात. मी फुटबॉल खेळतो, कबड्डी खेळत नाही पण, पहायला तिथे उपस्थित असतो. मुळात, मला खेळायला किंवा खेळ पहायला आवडते. पण, खेळांमध्ये व्यावसायिक म्हणून सहभागी होत एखादा संघ विकत घ्यायचा हे मला जमणार नाही. तसं करायचं झालं तर तुमचं संपूर्ण लक्ष त्या खेळावर कें द्रित झालं पाहिजे. माझं तसं नाही. मी जेव्हा चित्रपट करतो तेव्हा पूर्णपणे त्यातच गुंतलेलो असतो. त्यामुळे, मी कधीच खेळात व्यवसाय म्हणून शिरणार नाही’, असे आमिरने सांगितले. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ चित्रपटाने प्रोमोजपासूनच हंगामा उडवून दिला आहे. केवळ ट्रान्झिस्टर सोबतीला घेऊन नग्नावस्थेत प्रकट झालेल्या पोस्टरवरील ‘पीके’ला पाहून आमिर असं कसं करू शकतो?, सारख्या प्रश्नांचे मोहोळ उठले. ते आमिर आणि राजकुमार हिरानी दोघांच्याही मागे लागले असले तरी लोकांचा संताप, आश्चर्यमिश्रित संताप आम्हाला अपेक्षितच होता, असे आमिर म्हणतो. ‘पीके’चे पहिलेच पोस्टर असे का होते, याचे उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच लक्षात येईल, असे त्याने सांगितले. मात्र, सामाजिक जीवनात स्वत: आदर्श तत्त्वांचा झेंडा घेऊन उभं राहिलेल्या आमिरला चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी असं छायाचित्र देण्याची काय गरज होती?, असं विचारल्यावर तो शांतपणे उत्तर देतो. ‘मुळात या पोस्टरमध्ये बीभत्स असं काही नाही आहे. चित्रपटाचं कथानक लक्षात घेऊन त्याची कलात्मक प्रसिध्दी केली जाते. याला ‘की आर्ट’ असं म्हणतात. ‘पीके’ची कथाच एकदम वेगळी असल्याने आम्ही पोस्टरची त्यापध्दतीने मांडणी केली आणि ती योग्यच आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. आत्तापुरती तरी आमिर खान आणि राजकुमार हिरानी या दोघांनीही चित्रपटांमधून अश्लील चित्रण कधीच केलेलं नाही. त्यामुळे ते जेव्हा असं पोस्टर करतात तेव्हा त्यामागे निश्चितच काहीतरी कोरण असेल एवढंच लक्षात घेऊन पुढे चला..’, असं तो हसत हसत सांगतो.
‘पीके’ चित्रपटाच्या निमित्ताने आमिरने दुसऱ्यांदा दिग्दर्शक राजकुमार हिरानीबरोबर काम केलं आहे. राजूची कथा मांडण्याची शैली फार भिन्न आहे. त्याला नेहमी चित्रपटांमधून एखादं सूचक सामाजिक भाष्य करायचं असतं. मात्र, त्याची मांडणी ही नेहमी उपहासात्मक शैलीतून, विनोदातून गंभीर कथा मांडण्याची आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये नाटय़ ठासून भरलेलं असतं त्यामुळे विषय कितीही किचकट असेल प्रेक्षकांना चित्रपट पाहताना कंटाळा येत नाही. दिग्दर्शक म्हणून तो प्रेक्षकांना आपल्या कथेत रमवून ठेवतो. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला मजा येते, असे सांगत ‘पीके’ही त्याने असाच भन्नाट बनवला आहे.. एवढंच म्हणून तो थांबतो. (नाहीतर प्रेक्षकांची मजा निघून जाईल) या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एका व्यक्तीविषयी आमिर बोलला आहे तो म्हणजे संजय दत्त. संजय आणि आमिर ही जोडी या चित्रपटातून दिसणार आहे. दोघेही राजकुमार हिरानीचे खमके नायक राहिले आहेत आणि या चित्रपटात दोघेही एकत्र काम करत आहेत.
पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेल्या आमिरने आपल्या आजवरच्या कारकिर्दीत ‘अम्मी’ ही आपली खरी समीक्षक असल्याचं सांगितलं. त्याने अम्मीला ‘पीके’ दाखवला आहे आणि तिला तो बेहद्द आवडल्याचं तिने आपल्याला सांगितलं असं तो म्हणतो. माझ्या प्रत्येक चित्रपटाबद्दलच नव्हे तर मी जे जे काही करत असतो त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तिला आस्था असते, तिचं त्यावर बारकाईने लक्ष असतं आणि एखादी गोष्ट आवडली नाही तर ती सरळ तसं सांगते. अम्मीतला ठामपणा आणि हट्ट आपल्यातही उतरला असल्याचं तो म्हणतो. अम्मीच्या सगळ्याच गोष्टी मी ऐकत नाही. म्हणजे गेली कित्येक वर्ष ती मला सांगते आहे अरे, तू जास्तीत जास्त चित्रपट केले पाहिजेस. तुझी लोकप्रियता आहे तोपर्यंत तू चित्रपट कर. पण, याबाबतीत आपण अम्मीचं कधीच ऐकणार नाही, असं आमिर म्हणतो. वर्षांकाठी एक चित्रपट आणि आता ‘सत्यमेव जयते’ हे समीकरण पुढेही कायम राहिल असे त्याचे म्हणणे आहे. चित्रपटांबरोबरच आझादचं मोठं होणंही अनुभवतो आहे असं सांगणाऱ्या आमिरने किरणसाठी पुढच्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती दिली.
संजय दत्तबरोबर काम करतानाचा अनुभव फारच वेगळा होता. संजयमध्ये जात्याच एक प्रेमळपणा आहे. का कोण जाणे पण, तो समोरच्याला त्याच्याशी सहज जोडून घेतो. तुम्ही त्याच्याबरोबर असलात की त्याच्या प्रेमात गुरफटले जाता. पहिल्यांदाच ‘पीके’च्या सेटवर काम करत असताना जणू माझा मोठा भाऊ माझ्याबरोबर आहे आणि आम्ही एकत्र काम करतो आहोत, असं वाटलं. इतका त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव छान होता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Only a film in a year and satyamev jayate aamir khan