हिंदी चित्रपट किंवा मालिकांचे चित्रीकरण ज्या ठिकाणी सुरू असते तेथे बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक कलाकारांच्या भपकेबाज आणि आलिशान अशा व्हॅनिटी गाडय़ा लागलेल्या असतात. स्वत:च्या मालकीची व्हॅनिटी गाडी असणे हे मनोरंजनसृष्टीत प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला आपल्या स्वत:च्या मालकीची व्हॅनिटी असावी, असे वाटते. व्हॅनिटी म्हणजे चाकांवरचे फिरते अलिशान, आरामदायी दुसरे घरच. हिंदीत अनेक कलाकारांकडे स्वत:ची व्हॅनिटी गाडी आहे. मराठीत मात्र अजूनही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच कलाकारांकडे स्वत:च्या मालकीची व्हॅनिटी गाडी आहे.
*मराठीतील पहिली व्हॅनिटी भरत जाधवची
मराठीत आपल्या स्वत:च्या मालकीची पहिली व्हॅनिटी गाडी खरेदी करण्याचा मान अभिनेता भरत जाधव याच्याकडे जातो. मराठी चित्रपटसृष्टीतील व्हॅनिटी गाडीचा तो आद्य प्रवर्तक आहे. कारण मराठीतील एकाही कलावंताकडे स्वत:च्या मालकीची व्हॅनिटी नव्हती तेव्हा भरतने व्हॅनिटी गाडी घेतली. आता अभिनेता प्रसाद ओक यानेही स्वत:ची व्हॅनिटी घेतली आहे. हिंदीतील कलाकार चित्रीकरणस्थळी स्वत:ची व्हॅनिटी घेऊन येतात तसा भरत स्वत:ची व्हॅनिटी घेऊन जायला लागला तेव्हा भरतच्या त्या व्हॅनिटीची मराठी बरोबरच हिंदीतही चर्चा झाली होती. आपल्या व्हॅनिटीविषयी ‘वृत्तान्त’ला माहिती देताना भरत म्हणाला की, नाटक, चित्रपट आणि मालिका या सर्व माध्यमातून मी काम करतोय. नाटकाचे प्रयोग आणि मालिका व चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. त्यामुळे ताजेतवाने राहणे, आराम करता येणे, निर्माता-दिग्दर्शकांबरोबर चर्चा करणे, चित्रीकरणाच्या पुढील दृश्यापर्यंत संवाद वाचणे/पाठ करणे, नवीन संहितांचे वाचन करणे, वेळेअभावी जे चित्रपट पाहता येऊ शकत नाही ते व्हॅनिटीत पाहणे, रंगभूषा व वेषभूषा करणे या सगळ्यासाठी २००६ मध्ये मी पहिल्यांदा व्हॅनिटी घेतली. त्यानंतर २००९ मध्ये तिची संपूर्ण डागडुजी करून तिला नवे रुप दिले. जेव्हापासून मी व्हॅनिटी घेतली आहे, तेव्हापासून आजतागायत मी तिचा खूप वापर केला आणि करतो आहे.
*सेकंड हॅण्ड गाडीची केली व्हॅनिटी
९०७ या प्रकारातील टेम्पो वाहन मी त्या वेळी सेकंड हॅण्ड विकत घेतले आणि त्यात मला हव्या होत्या तशा सोयी करून घेतल्या. तेव्हा मला १६ लाख रुपये खर्च आला होता. तीन वर्षांनंतर पुन्हा नव्याने मी या व्हॅनिटीची बांधणी करून घेतली त्याला तेव्हा १४ लाख रुपये खर्च झाला. आज जवळपास अनेक मराठी कलाकारांकडे स्वत:ची गाडी आहे. त्याप्रमाणेच अनेक मराठी कलाकारांची स्वत:ची व्हॅनिटी गाडी व्हावी, असे मला वाटते. अभिनेता प्रसाद ओकने व्हॅनिटी घ्यायचे ठरविले तेव्हा त्याने मला फोन करून याबाबत विचारले, माहिती घेतली. प्रसाद व्हॅनिटी घेतोय हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला.
*व्हॅनिटीत पहिली रंगभूषा विजूमामाची
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना मी मानतो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. ‘मुंबईचा डबेवाला’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. माझी व्हॅनिटी चित्रीकरण स्थळी पोहोचली होती. मी सेटवर संबंधिताना फोन करून मी येतोच आहे, पण विजय चव्हाण तेथे आले असतील तर त्यांची रंगभूषा मी आल्याशिवाय करू नका, असे सांगून ठेवले होते. मी चित्रीकरणस्थळी पोहोचलो. विजू मामांच्या हस्ते श्रीफळ वाढविले आणि माझ्या व्हॅनिटीत पहिल्यांदा त्यांना रंगभूषा करण्यासाठी बसविले, अशी आठवणही भरतने सांगितली.  
तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा
मराठीत आज प्रसादकडे त्याची व्हॅनिटी आहे. मराठीतील अनेक कलाकारांकडे जेव्हा स्वत:ची व्हॅनिटी येईल तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा असेल, असेही भरत म्हणाला.
*आरामदायी व्हॅनिटी
बाह्य़ चित्रीकरणाच्या वेळी कलाकारांना खासगीपणा मिळण्यासाठी या व्हॅनिटी गाडय़ा उपयोगी पडतात. वातानुकूलित असलेल्या या व्हॅनिटीमध्ये बसून आराम करणे, झोपणे, वेशभूषा किंवा रंगभूषा करणे, सोयीचे जाते. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार हव्या त्या सोयी, अत्याधुनिक सोयी-सुविधा करून घेत असतो. यात सोफाकम बेड पासून टॉयलेट, बाथरुम, बसण्यासाठी खुच्र्या, वॉशबेसिन, आरामदायी पलंग आदी सर्व सुखसोयी असतात. कलाकारांचा खासगीपणा जपणाऱ्या या व्हॅनिटी गाडय़ा आता सर्रास स्टुडिओ, सेट किंवा बा’ा चित्रीकरण स्थळी पाहायला मिळत आहेत.    
*किंमतीची कोटीच्या कोटी उड्डाणे
व्हॅनिटी गाडी विकत घेणे किंवा त्यात आपल्याला पाहिजे त्या सोयी करून घेणे हे प्रत्येक कलाकार आपापल्या कुवतीप्रमाणे करत असतो. ३५ ते ४० लाखांपासून सुरू होणाऱ्या एका व्हॅनिटी गाडीची किंमत दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंत जाते. तिच्या देखभालीचा खर्च महिन्याला २० ते २५ हजार रुपये इतका येतो. व्हॅनिटी गाडीची लांबी अन्य गाडय़ांच्या तुलनेत जास्त असल्याने ती गाडी पार्क करण्यासाठीही अधिक कर भरावा लागतो. अनेक कंपन्या अशा व्हॅनिटी गाडय़ा भाडय़ानेही उपलब्ध करून देतात. बॉलिवूडमध्ये सध्या २०० हून अधिक व्हॅनिटी गाडय़ा आहेत. मराठीत मात्र हे प्रमाण अगदीच कमी आहे. बॉलिवूडमधील ‘खान’दानी अभिनेते सलमान खान, शाहरुख खान यांच्या व्हॅनिटी गाडय़ा अत्यंत आलिशान आणि भपकेबाज अशा आहेत. शाहरुखच्या व्हॅनिटीची किंमत सुमारे ३ कोटी ५० लाख असल्याचे सांगितले जाते.