रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे) होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात ‘ला ला लॅण्ड’ या चित्रपटाचे सर्वाधिक वर्चस्व असेलच, पण त्या जोडीला अनेक संस्मरणीय गोष्टी घडण्याची चिन्हे आहेत. कॅलिफोर्नियातील हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये अतिशय प्रतिष्ठेचा असा ८९ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगणार आहे. चित्रपटसृष्टींमधील सर्व पुरस्कारांमध्ये ऑस्कर हा मानाचा पुरस्कार समजला जातो. ऑस्करची बाहुली आपल्या हातात नाही आली तरी चालेल पण निदान या पुरस्कारासाठी नामांकन तरी मिळावे अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा येते. ऑस्करमध्ये नामांकित झालेल्या चित्रपटांच्या नावांचा नेहमीच गवगवा होतो. पण, यावेळेस आपण अशा चित्रटांवर नजर टाकणार आहोत ज्या चित्रपटांचा ते त्या दर्जाचे असूनही विचार करण्यात आलेला नाही. जे चित्रपट ‘ला ला लॅण्ड’ आणि ‘मूनलाइट’ या चित्रटांच्या पंक्तीमध्ये जाऊ शकले असते पण काही अनियंत्रित नियमांमुळे तसे होऊ शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पॅटरसन’


दिग्दर्शक जीम जॅरमश दिग्दर्शित या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात चांगली पसंती मिळाली होती. न्यू जर्सीमध्ये असलेला बस ड्रायव्हर जो एक कवीदेखील असतो त्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. अॅडमने या चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे.

‘डोन्ट थिंक ट्वाइस’


सायन्स फिक्शन किंवा अॅक्शनपटांप्रमाणे विनोदी चित्रपटांना अॅकॅडमी पुरस्कारांमध्ये स्थान मिळत नाही. ‘डोन्ट थिंक ट्वाइस’ हा देखील अशाच प्रकारात मोडणारा चित्रपट आहे.

‘सिंग स्ट्रिट’


यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ‘ला ला लॅण्ड’ चे वर्चस्व पाहायला मिळण्याची शक्यता असताना आणखी एक संगीतावर आधारित चित्रपट जो पूर्णपणे वगळण्यात आला आहे तो म्हणजे ‘सिंग स्ट्रिट’. जॉन कार्नि दिग्दर्शित या चित्रपटाला संगीत विभागातदेखील एकही नामांकन मिळालेलं नाही.

‘द नाइस गाइज’


अभिनेता रायन गॉस्लिंग याला यावर्षात बरीच प्रशंसा मिळालेली आहे. ऑस्करसाठी तो सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात नामांकित करण्यात आला आहे. मात्र, त्याचा अभिनय असलेल्या आणि शेन ब्लॅकने दिग्दर्शित केलेल्या ‘द नाइस गाइज’ या चित्रपटाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

‘आय इन द स्काय’


हा चित्रपट ऑस्करमध्ये नामांकित होण्यास अगदी सहज पात्र होता. या चित्रटाचे दिग्दर्शन ऑस्कर विजेता  गॅविन हूडने केले आहे. तर ऑस्कर विजेती हेलन मिरेनने यात अभिनय केला आहे. हेलन मिरेननं कर्नल कॅथरिन पॉवेलची भूमिका जी काही रंगवली आहे, त्याला तोड नाही. ब्रिटनने तिला ‘डेम’ हा किताबदेखील दिला आहे. ‘द क्‍वीन’मध्ये तिने राणी एलिझाबेथचा रोल असा काही केला होता, की खुद्द राणीने तिला पॅलेसमध्ये जेवायला बोलावलेल.

‘डेडपूल’


कॉमिक पुस्तकावर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. याच क्रमातला ‘डेडपूल’ हा चित्रपट. मार्वल कॉमिक्सच्या एक्स मेनमधील ‘डेडपूल’ हे एक पात्र आहे. या चित्रपटाला सुरुवातीला विनोदामध्येच घेण्यात आले होते. मात्र, याला गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये स्थान मिळाल्यानंतर त्याचे महत्त्व वाढले. पण, तरीही हा चित्रपट ऑस्करमध्ये नामांकन मिळवू शकला नाही.

‘क्वीन ऑफ कॅटवे’


साधारणत: प्रेरणादायी कथांवर आधारित चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन दिले जाते. त्याचेच उदाहरण म्हणजे लायन चित्रपट. मीरा नायरचा ‘क्वीन ऑफ कॅटवे’ हा चित्रपट ‘लायन’सारखाच प्रेरणादायी कथेवर आधारित असूनही त्याला नामांकन मिळाले नाही.

‘द एज ऑफ सेवेनटीन’


ऑस्करमध्ये बहुदा केवळ ‘मूनलाइट’सारखे गंभीर विषयच घेतले जात असावे. कारण किशोरवयीन मुलांवर बेतलेल्या ‘द एज ऑफ सेवेनटीन’ या चित्रपटालाही नामांकनातून वगळण्यात आलेले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscars 2017 films that deserved glory but were totally snubbed by the academy
First published on: 26-02-2017 at 01:10 IST