ओटीटीसारखे अनेक पर्याय उपलब्ध झाले तरी मालिकांचे स्थान हलणार नाही असा विश्वास अनेक कलाकारांकडून व्यक्त केला जातो. तितक्या तल्लीनतेने प्रेक्षक मालिका बघतातही. त्यामुळे टीका करण्याचाही पूर्ण अधिकार ते स्वत:कडे राखून ठेवतात. घराघरांत होणाऱ्या या टीकात्मक चर्चा आज समाजमाध्यमांवर उघडपणे येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे ही शेरेबाजी तरुणांकडून केली आहे. यात अधोरेखित करण्याची सकारात्मक बाब म्हणजे तरुण वर्ग मालिका पाहतो आहे. पण नावडत्या गोष्टींवर बोट ठेवायलाही तो विसरत नाही. त्यामुळे हा कल लक्षात घेऊन मालिका साकारल्या तर कदाचित पुन्हा वाहिन्यांचे सुवर्णयुग येईल यात शंका नाही. हाच आशावाद बाळगून मायबाप रसिकांना नेमके खटकते काय, याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न…

गरजेपेक्षा अतिरंजित, मुद्द्याला सोडून किंवा रंगवण्यासाठी अनावश्यक लांबवलेले भाग याला नापसंती दर्शवली जात आहे. म्हणजे वास्तवाला, विवेकाला धरून असलेल्या आणि सामान्य माणसांच्या जवळ जाणाऱ्या कथा लोकांना आवडत आहेत, असे दिसते. म्हणूनच ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘असंभव’, ‘अग्निहोत्र’ यांसारख्या मालिकांचे प्रेक्षक आजही दिवाने आहेत. रंजकतेशिवाय मालिका नाही हे गणित मान्यच आहे, पण त्यालाही कुठे तरी सीमा असाव्यात. कारण अंगावर येणारे भाग कधी तरी कल्पनेच्या पार पार वरून जातात. अर्थात हे धक्कातंत्र असले तरी तो किती द्यायचा याचे परिमाण असायला हवे. कधी तरी तो इतका अवास्तव होतो की हातातला रिमोट टीव्हीवर मारण्याऐवजी प्रेक्षकही टीव्ही बंद करून संयमाची भूमिका घेतात. पण मालिका काही संयमावर यायला तयार नाहीत. अर्थात प्रेक्षकांना नवे टीव्ही परवडणार नाहीत, हा भाग निराळाच…

मालिका हा काही केवळ महिलांनी पाहण्याचा भाग नाही. मालिकांचा सर्वाधिक प्रेक्षक असणारा मध्यमवर्ग आजही दीड खणाच्या खोलीत राहतो. त्यामुळे त्या सहकुटुंब- सहपरिवार पहिल्या जातात. लहान मुलेही मालिका बघताना समोर असतात. अशा वेळी एका पुरुषाची दोन प्रेमप्रकरणे, बायको असतानाही प्रेयसी असणे, अत्याचार, कावे हे त्यांच्याही लक्षात येत असतात. गंमत म्हणजे अशा मालिका पाहून लहानग्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आईवडिलांच्या तोंडचे पाणी पळते. एका घरात ‘अण्णा’ म्हणून आदराने संबोधल्या जाणाऱ्या आजोबांना एक नात विचारते, ‘अण्णा, तुमची शेवंता कुठे आहे.’ तेव्हापासून तिच्या आज्जीने अद्याप काही टीव्ही लावलेला नाही.

जवळपास सगळ्याच वाहिन्यांची हीच अवस्था आहे. झी मराठीवरील ‘अगं बाई सूनबाई’ मालिका पाहताना ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरी होती अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहे. इतक्या सुशिक्षित आईचा मुलगा, प्रेमविवाह केलेल्या बायकोशी ज्या पद्धतीने वागतो आहे, ते शोषण दाखवून नेमके काय मांडायचे आहे हे अद्याप कळलेले नाही. याच वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या, पण आदित्यची दुर्दशा पाहून सारेच दीप मंदावले आता अशी स्थिती आहे. ‘स्वीटूच्या संपूर्ण कुटुंबाला व्यवहारज्ञानाचे धडे द्यायला हवेत, कारण ते कमावतात कमी नि पदरमोडच अधिक करतात,’ अशी प्रतिक्रिया ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेवर आली आहे.

कलर्स मराठीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची संपूर्ण ‘वट’ वटपौर्णिमा विशेष भागाने घालवली. एका लोकप्रिय कवीने लिहिले आहे, ‘एकच मालिका होती जी मी आवर्जून पाहत होतो. पण कुणावर अशी वेळ आणि मालिकेचे चित्र पालटले देव जाणे.’ नात्यात करार असतानाही नाते टिकवण्याची धडपड करणारे अभिमन्यू आणि लतिका जवळजवळ काळजात घर करू लागले होते. पण इतके समंजस जोडपे संपूर्ण गावासमोर आपल्या नात्याची लक्तरे निघूच कसे देऊ शकते. एवढेच नाही तर एवढी संयत भूमिका घेणारे बापू चक्क कामिनीच्या बोलण्याला प्राधान्य देऊन इतकी टोकाची भूमिका घेतात की आपल्याच लेकीच्या गळ्यातले मंगळसूत्र ते तोडतात. आता उद्या ते अभिमन्यूच्या नावाने अंघोळही करतील. वरकरणी हे रंजक वाटत असले तरी प्रेक्षकांना मात्र हा ‘मेलोड्रामा’ आवडलेला नाही. ‘राजा-राणीची गं जोडी’ या मालिकेतही खलबतांचे आणि नकारात्मकतेचे प्रमाण इतके वाढले आहे की, ‘संजू व्हर्सेस ढाले पाटील विथ गुलाब भोसले’ असा कॉम्बो पॅकच समोर आला आहे. त्यामुळे अनेकांनी आजपासून मालिकेला रामराम केल्याचेही समाजमाध्यमांवर नमूद केले आहे. विशेष म्हणजे वाघासारखा सुजित ढाले पाटील गुलाम कसा झाला याची कथा काही समोर आली नाही, ती आली तर किमान या रहस्याचा उलगडा तरी होईल. ‘बायको अश्शी हवी’ या मालिकेत तर सुरुवातीपासूनच अत्याचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. त्यामुळे पुढे मसालाच मसाला असेल यात शंका नाही. फक्त याचा ठसका प्रेक्षकांना लागायला नको म्हणजे मिळवले.

स्टार प्रवाहचे दुखणेही काही नवे नाही. मालिकांमध्ये जावानंदांकडून कुरघोड्या होतातच, पण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शालिनीच्या कुरघोड्यांचा हात अद्याप कुणी धरू शकलेले नाही. तर माणसाने किती मंद असावे याचा दाखला वारंवार गौरी आपल्याला करून देते. एवढ्यात मुक्याला वाचा आली असती, अंधाला दृष्टी आली असती पण गौरीचा साधेपणा काही जात नाही बाबा. नेमकी ती कोणत्या मातीची बनली आहे याचा शोध सध्या वैज्ञानिक घेत आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा आदर्श महिला घेत होत्या. पण डॉक्टर झालेला अभी एका मुलीच्या खोट्या कृत्याला बळी काय पडतो, अनघासारख्या मुलीशी नाते काय तोडतो, हे सगळेच भीषण वाटणारे आहे. तर दुसरीकडे ‘रंग माझा वेगळा’मध्ये डॉक्टर असणारा कार्तिक चक्क आपल्या बायकोवर संशय घेतो. मग ती घर सोडते, विटा वाहते, भाड्याने राहते, सगळेच अजब आहे. याची मालिके त सांगड घातलेली असली तरी सामान्य माणसांना काही याची तार्किक संगीत लागणे कठीण आहे. ‘चांगले काही घडूच नये, असे वातावरण म्हणजे मालिका का?’ असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत आजवर तीन नायिका बदलूनही महिला सुरू आहे ही या मालिकेची जमेची बाजू. पण भक्ती, शक्ती, नकारात्मक शक्ती आणि सामान्य मानवी जीवन याचा मेळ साधण्यात ही मालिका कमी पडलेली वाटते. आज लाखो काळूबाईचे भक्त ही मालिका पाहत असले तरी यात दाखवले गेलेले चमत्कार आजवर प्रत्यक्षात कोणत्याही भक्ताने पाहिले नसल्याचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे व्हीएफएक्सचा वापर करून तयार केलेली दृश्ये आणि खलप्रवृत्तीच्या भूमिका याची वास्तवाशी भलतीच विसंगती जाणवते.

मालिकांचा घेतलेला वेध, मतमतांतरे हे वैयक्तिक विश्लेषण नसून प्रेक्षकांच्या कलातून, प्रतिक्रियांमधून उमटलेले प्रतिबिंब आहे. या टीका असल्या तरी हा जनमताचा नाराजीनामा आहे. अर्थात प्रेक्षक मंडळी ही हक्काची असल्याने त्यांची नाराजी ही घरचीच आहे असे मानून त्याचा स्वीकार करायला हरकत नाही. काहींनी तर आमच्या प्रतिक्रियांचा कधी तरी विचार करत जा, अशीही विनंती वाहिन्यांना केली आहे. मालिकांचे पडसाद सामान्य माणसांच्या घरात उमटत असल्याने ते जसे मनातले बोलून दाखवतात तसे वेळप्रसंगी मालिका डोक्यावर घेऊन मिरवतातही. त्यामुळे वाईट ते मागे सोडून चांगले काय घेता येईल याचा विचार मालिका जगतात व्हायला हवा.