Netflix Trending Movie: ओटीटीवर दर आठवड्याला नवीन चित्रपट रिलीज होतात. थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेले काही चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग असतात. दाक्षिणात्य कलाकारांचा असाच एक चित्रपट नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर १०३ कोटी रुपयांचं नुकसान झालेला हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्याआधीच त्याची जोरदार चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात मात्र प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. हा फ्लॉप चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंडिंग आहे.
२ तास ४५ मिनिटांच्या या चित्रपटाचे नाव ‘ठग लाइफ’ आहे. कमल हासन यांच्याबरोबरच चित्रपटात सिलंबरासन टीआर, त्रिशा, अभिरामी, अली फजल आणि नासिर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट निर्मात्यांनी घोषणा केली तेव्हापासूनच चर्चेत होता. याचं मुख्य कारण म्हणजे ७० वर्षीय कमल हासन यांचा त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या त्रिशाबरोबर किसिंग सीन आहे.
ठग लाइफ चित्रपटाची कथा
या चित्रपटाची कथा एका एन्काउंटरने सुरू होते. कमल हासन यांनी चित्रपटात एका गुंडाची भूमिका साकारली आहे. ते एका एन्काउंटरमध्ये अडकतात. तिथे त्याला एक मूल सापडतं आणि मग कथा पुढे सरकत जाते.
‘ठग लाइफ’ या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. खरं तर ५ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. मात्र, त्याला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट २०० कोटी होते, पण चित्रपटाने जगभरात फक्त ९७.८७ कोटी रुपये कमावले.
चित्रपट ओटीटीवर घालतोय धुमाकूळ
थिएटरमध्ये ‘ठग लाइफ’ फ्लॉप ठरला. त्यानंतर निर्मात्यांनी ३ जुलैला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पण तो सातत्याने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत आहे.
३० दिवसांपासून ओटीटीवर ट्रेंडिंग आहे चित्रपट
‘ठग लाइफ’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ८ व्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे आणि इतर चित्रपटांना जोरदार टक्कर देत आहे. IMDb वर या चित्रपटाला ४.२ रेटिंग मिळाले आहे. रेटिंग फार चांगलं नसलं तरी कमल हासन यांचा हा चित्रपट OTT वर प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.