ओटीटी माध्यमांवर चौकटीबाहेरचे अनेक विषय हाताळले जातात, यामुळे कलाकारांना एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकून न राहता विविध भूमिका साकारण्याची संधी मिळते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी २०२२ मध्ये आलेल्या ‘रानबाजार’ वेबसीरिजमध्ये अप्पा दिवेकर हे पात्र साकारून प्रेक्षकांना चकित केले होते. ही भूमिका त्यांच्या नेहमीच्या विनोदी भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. आता ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजच्या निमित्ताने मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.

सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सीरिजमधील घटना मकरंद अनासपुरे यांच्या गावाजवळ घडल्याचे त्यांनी सांगितले. सोनी लिव्हवर प्रदर्शित होणारी ही रोमांचक सीरिज १९७२ ते १९७४ दरम्यान घडलेल्या भयावह हत्याकांडावर आधारित आहे. मकरंद अनासपुरे यांनी या सीरिजमध्ये उत्तमराव बऱ्हाटे या महत्त्वपूर्ण भूमिकेत काम केले आहे. या भूमिकेबद्दल ते म्हणाले, “पूर्ण न झालेल्या इच्छांमध्ये गुरफटून गेलेल्या उत्तमरावची भूमिका साकारणे आव्हानात्मक, पण त्याचवेळी खास अनुभवही होता. ही भूमिका माझ्या नेहमीच्या विनोदी भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. मला ही संधी दिल्याबद्दल आदिनाथ कोठारे आणि आशीष बेंडे यांचे मनःपूर्वक आभार.”

हेही वाचा…ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट OTT वर होत आहेत प्रदर्शित, वाचा यादी

मानवत हत्याकांडाच्या आठवणी

मानवत गावाजवळील एका गावामध्‍ये मोठे झालेले अनासपुरे यांच्‍या या हत्‍याकांडासंदर्भातील भयावह कथांबाबत काही आठवणी आहेत. ते म्‍हणाले, ”मानवत गाव हे माझ्या गावाजवळ असल्‍यामुळे या गावातील भयावह कथांनी मला बालपणीच्‍या भीतीची आठवण करून दिली. या भयावह हत्‍याकांडाबाबत आमच्‍या गावामध्‍ये चर्चा केली जायची, ज्‍याचा आमच्‍या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. आम्‍ही फक्‍त सायंकाळपर्यंत खेळायचो आणि अंधार झाला की संपूर्ण गाव स्‍मशानासारखे शांत होऊन जायचे.”

हेही वाचा…‘कलम ३७०’ते काश्मीरमधील विविध घटनांवर आधारित आहेत बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे, ओटीटीवर आहेत उपलब्ध; जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर पोलिसांच्या भूमिकेत

विविध हत्याकांड, त्यांची चौकशी करणारा पोलिस अधिकारी रमाकांत एस. कुलकर्णी गुंतागुंतीच्या केसेस, या भोवती ‘मानवत मर्डर्स’ची कथा फिरते. या भूमिकेत आशुतोष गोवारीकर दिसणार आहेत. ही वेबसीरिज ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.