प्रसिद्ध ओत्तनथुल्लाल कलाकार कलामंडलम् गीतानंदन यांचे व्यासपीठावर नृत्य करत असतानाच रविवारी अवित्ताथुर येथे निधन झाले. ५८ वर्षीय कलामंडलम् हे थिएटर आर्टिस्ट आणि अभिनेते होते. नृत्य करत असतानाच ते अचानक मंचावर कोसळले. त्यावेळी त्यांना तातडीने प्रथमोपचार देऊन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीतानंदन यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून स्टेज शो करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आजवर ५००० स्टेज शो केले. १९८३मध्ये ते केरळ कलालमंडलम् येथे ओत्तनथुल्लाल नृत्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर जवळपास २५ वर्षे तेथे काम केल्यानंतर तेथील मुख्य पदावरून ते निवृत्त झाले. केरळच्या शास्त्रीय रंगमंच कलेतील त्यांचे योगदान अद्वितीय आहे. लहानपणापासूनच ते निष्णात असलेल्या कलेचा प्रसार करण्यासाठी त्यांना नेहमीच नावाजले जाते. माध्यमांच्या वृत्तानुसार, १९८४ साली फ्रान्समध्ये सादरीकरण करणारे ते पहिले ओत्तनथुल्लाल कलाकार होते.

मल्याळम चित्रपटसृष्टीतही गीतानंदन सक्रिय होते. १९९२ मध्ये आलेल्या ‘कमलादलम’ या चित्रपटाने त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यासह त्यांनी ‘थुवल कोत्तराम’, ‘मनसीनाक्करे’, ‘नरेंद्र मगन जयकंथन वागा’ आणि इतरही काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. गीतानंदन यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पिनरै विजयन् यांनी दुःख व्यक्त केले.

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांचाही प्रयोगादरम्यानच मृत्यू झाला होता. २३ ऑक्टोबर २०१६ या दिवशी पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने अश्विनी यांचे निधन झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ottanthullal artiste kalamandalam geethanandan dies during a stage performance
First published on: 30-01-2018 at 09:48 IST