दूरदर्शन हे एकमेव माध्यम असल्याने ‘चिमणराव’च्या भूमिकेने मला चेहरा, प्रतिमा आणि ओळख मिळाली. पण, स्वत:ला शोधण्याची प्रक्रिया ही रत्नाकर मतकरी यांच्या नाटकांतून सुरू झाली. ‘वासूची सासू’, ‘नातीगोती’ आणि पुलंच्या ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकांमुळे चिमणरावचा शिक्का पुसला गेला. गंभीर भूमिका सक्षमपणे करू शकतो हा आत्मविश्वास रंगभूमीने दिला, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी शनिवारी व्यक्त केली.
कॉसमॉस बँक प्रस्तुत, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन मीडिया यांच्यातर्फे आयोजित ‘पुलोत्सव’मध्ये ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते प्रभावळकर यांना पुलं स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, मयूर वैद्य, नयनीश देशपांडे या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात प्रा. अरुण नूलकर यांनी प्रभावळकर यांच्याशी संवाद साधला. ‘अलबत्या गलबत्या’ नाटकासह ‘एन्काउंटर’, ‘सरकारराज’, ‘नारबाची वाडी’ या चित्रपटातील काही दृश्ये पडद्यावर दाखविण्यात आली.
‘‘नियंत्रण नसल्याचा अभिनय हा नियंत्रण असल्याखेरीज होऊ शकत नाही. नाटक, चित्रपटातून म्हाताऱ्याच्या भूमिका केल्या तरी प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असावी हा कटाक्ष कायम ठेवला,’’ असे सांगून प्रभावळकर म्हणाले,‘‘भूमिका करताना स्वत:चे व्यक्तिमत्त्व विसरू शकत नाही. व्यक्तिरेखेचे व्यक्तिमत्त्व आणि स्वत:ला समोरुन पाहत नियंत्रण ठेवू शकणे असे तिहेरी भान सांभाळावे लागते. हसविणे आणि हलविणे यामध्ये मोठे ‘थ्रिल’ आहे. पोटापाण्यासाठी करावे लागते ती उपजीविका आणि मनापासून करावी लागते ती जीविका. जीविका हीच माझी उपजीविका झाली याचा आनंद आहे. लोकप्रियता आणि पैसा यापेक्षाही समाधान हेच माझ्यासाठी यशाचे गमक आहे.’’
पुलंचा कलाविष्कार पाहून, त्यांची भाषणे आणि गाणी ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. विनोद कळला हे समजायला पुलंचे लेखन उपयोगी ठरले. पुलंच्या विनोदाने जगण्याची निकोप दृष्टी दिली. अपार आदर आणि माझ्यासाठी आदर्श असलेल्या पुलंच्या नावाचा सन्मान मी विनम्रतेने स्वीकारतो, असेही प्रभावळकर यांनी सांगितले. सर्वच कलांमध्ये समाज रस घेतो असे वातावरण भविष्यात होईल यासाठी ‘पुलोत्सव’ ही नांदी ठरावी, अशी इच्छा रवी परांजपे यांनी प्रदर्शित केली.