प्रदर्शित होऊन चार आठवडे झाले असले तरी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ हा चित्रपट अजूनही जगभरातील चित्रपटगृहांमध्ये झळकत असून या चित्रपटाने ५२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत ऐतिहासिक चित्रपटांच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला आहे. शाहरूख, सलमान आणि आमिर यापैकी कोणताही खान हिरो नसताना चित्रपटाने केलेली विक्रमी कमाई ही नोंद करण्याजोगी घटना असल्याचे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे. भन्साळी हे ऐतिहासिक भव्य पटांसाठी ओळखले जातात मात्र आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘पद्मावत’ची नोंद झाली आहे. गेले वर्षभर वादविवादात सापडलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट दोन महिने उशिरा प्रदर्शित झाला त्यामुळे या चित्रपटाच्या व्यवसायाला फटका बसणार, अशी चित्रपटगृह व्यावसायिकांसह ट्रेड विश्लेषकांचीही अटकळ होती. मात्र हळूहळू का होईना चार आठवडय़ांत या चित्रपटाने ५२५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून अजूनही चित्रपट सगळीकडे दाखवला जातो आहे. भव्य चित्रपट, तपशीलात जाऊन केलेले चित्रण आणि चित्रपट माध्यमाकडे पाहण्याची अनोखी दृष्टी या जोरावर भन्साळींनी जो लौकिक कमावला आहे तो आजवर कोणत्याही दिग्दर्शकाला मिळवता आलेला नाही. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर या तिघांनाही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा सुपरहिट चित्रपट देत त्यांना तिकीटबारीवर राज्य करण्याची संधी भन्साळींनी ‘पद्मावत’च्या माध्यमातून दिली आहे, अशा शब्दांत कौतूक करत ट्रेड विश्लेषकांनी त्यांना ‘मुव्ही मोगल’ असा किताब बहाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padmaavat earns mammoth rs 525 crores worldwide
First published on: 22-02-2018 at 01:39 IST