करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशात आता राजघराण्यातही या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. अनेक नेटकऱ्यांनी प्रिन्स चार्ल्स यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना केली आहे. तसेच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील प्रिन्स चार्ल्स लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.
या अभिनेत्री म्हणजे पद्मीनी कोल्हापूरे आहेत. प्रिन्स चार्ल्स यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच ‘स्पॉटबॉय’ या वेबसाईटने पद्मीनी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी प्रिन्स चार्ल्स यांना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली आहे.
१९८० मध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी भारत दौरा केला होता. दरम्यान त्यांचे स्वागत अभिनेत्री पद्मीनी कोल्हापूरे यांनी केले होते. तेव्हा त्यांनी स्वागत करताना प्रिन्स चार्ल्स यांना गालावर चुंबन केले होते. त्यामुळे पद्मीनी कोल्हापुरे आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या विषयी त्यावेळी जोरदार चर्चा रंगल्या होत्या.