जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदूकोण मंगळवारी ७ जानेवारी रोजी रात्री विद्यापीठात पोहोचली होती. दीपिकाने विद्यार्थांना पाठिंबा दिल्याने अनेकांनी तिचे कौतुक केले. पण अनेक भाजपासमर्थकांनी दीपिकाला लक्ष्य केले. दीपिकाच्या ‘छपाक’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही अनेकांनी केली. दरम्यान पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते आसिफ घाफूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिकाला शाबासकी देत सर्वांचे लक्ष वेधले.

‘सत्याच्या आणि तरुणांच्या बाजूने उभी राहिल्याबद्दल दीपिका तुझे कौतुक. तू कठीण प्रसंगात धैर्य दाखवून स्वतःला सिद्ध केले आहेस. माणुसकीपेक्षा मोठे काही नसते’ असे त्यांनी ट्विट करत दीपिकाचे कौतुक केले आहे.

घाफूर यांनी ट्विटच्या शेवटी हॅशटॅग देत दीपिकाचे नाव लिहिले होते. पण दीपिकाच्या नावाचे स्पेलिंग चूकीचे लिहिल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. काही वेळातच घाफूर यांनी त्यांचे ट्विट सोशल मीडियावरुन डिलिट केले. पण तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.