अभिनेत्री पल्लवी सुभाष बऱ्याच काळानंतर मराठी नाटकात दिसणार आहे. ‘नाट्यमंदार’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ या दोन संस्थांच्या ‘खळी’ या नवीन नाटकात पल्लवी मुख्य भूमिका साकारत आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन शिरीष लाटकर यांनी केले आहे. पल्लवी सुभाष सोबत संदेश जाधव व नेहा अष्टपुत्रे यांच्या या नाटकात भूमिका आहेत. १५ डिसेंबर रोजी या नाटकाचा शुभारंभ मुंबईच्या दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे.

‘बऱ्याच वर्षांनंतर मी नाटक करत आहे आणि याचे कारण म्हणजे मला या नाटकाची कथा खूप आवडली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी या नाटकाच्या प्रेमातच पडले. या नाटकात मी ‘उपासना’ हे पात्र करत आहे. ही उपासना थोडीफार माझ्यासारखीच आहे. त्यामुळे ही भूमिका करताना मला फार आनंद होत आहे,’ असे या भूमिकेविषयी बोलताना पल्लवी सांगते.

या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना केली आहे. महेश नाईक यांचे पार्श्वसंगीत या नाटकाला आहे. या नाटकासाठी एक खास गाणे करण्यात आले आहे. बीना सातोस्कर यांनी हे गाणे लिहिले असून, केतन पटवर्धन यांनी त्याला संगीत दिले आहे. स्वरांगी मराठे यांच्यासह केतन पटवर्धन यांनी हे गाणे गायले आहे. मिताली शिंदे यांनी वेशभूषेची तर दत्ता भाटकर यांनी रंगभूषेची जबाबदारी या नाटकासाठी सांभाळली आहे. ‘नाट्यमंदार’चे मंदार शिंदे तसेच ‘विप्रा क्रिएशन्स’च्या संध्या रोठे व प्रांजली मते हे या नाटकाचे निर्माते आहेत.