मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. त्यापूर्वी या चित्रपटातील ‘मर्द मराठा’ हे गाणं प्रदर्शित झालं. अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं हे गाणं अजयसोबत कुणाल गांजावाला, सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर, पद्मनाभ गायकवाड आणि प्रियांका बर्वे यांनी गायलं आहे. प्रियांकाने तिच्या गायनासोबतच सौंदर्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
‘संगीत सम्राट’ या शोच्या सूत्रसंचालनानं प्रियांका घराघरांत पोहोचली. ‘काळोखाच्या वाटेवरती उजेडा रुसला बाई’ याच्या पार्श्वगायनासाठी तिला राज्य पुरस्कार मिळाला. अलीकडेच येऊन गेलेल्या ‘आनंदी गोपाळ’मधील ‘वाटा वाटा वाटा गं’ हे तिचं गाणंसुद्धा चांगलंच लोकप्रिय झालं. त्याआधी ‘रमा माधव’, ‘लॉस्ट अँड फाऊंड’, ‘डबल सीट’ या चित्रपटांसाठीही तिने गायन केलं. त्यासोबतच ‘मला सासू हवी’ आणि ‘इथेच टाका तंबू’ या मालिकांची शीर्षकगीतंही प्रियांकानं गायलीत.
‘मुघल-ए-आझम’ या भव्यदिव्य संगीतनाटकात प्रियांका बर्वेने अनारकलीची भूमिका साकारली. तिच्या भूमिकेचं बॉलिवूड स्टार्सकडूनही भरभरुन कौतुक झालं होतं. नृत्य, अभिनय आणि गायन अशा तिन्ही कला सादर करण्याची संधी तिला या नाटकात मिळाली.