स्टार प्रवाहवर २२ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘देवा श्री गणेशा’ मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतल्या गणपती बाप्पा आणि माता पार्वतीचा लूक याआधीच समोर आहे. त्यामुळे शिवशंकाराची भूमिका कोण साकारणार याविषयी कुतूहल होतं. शिवशंकराची भूमिका साकारणार आहे अभिनेता पंकज विष्णू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भूमिकेविषयी सांगताना पंकज विष्णू म्हणाले, ‘देवा श्री गणेशा ही मालिका गणेश चतुर्थीपासून सुरु होत आहे. या पवित्र महिन्यात साक्षात शिवशंकर साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. मी खूप वर्षांनंतर मराठी मालिकेत काम करत आहे त्यामुळे प्रचंड उत्सुक आहे. कोणतंही पात्र साकारताना ते पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे. शिवशंकराला आपण भोलेनाथ म्हणतो. तो जसा भोळा आहे तसाच त्याचा रौद्र अवतारही पाहायला मिळतो. त्यामुळे भोलेनाथाच्या या दोन्ही छटा मालिकेत साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी मी केलीच आहे. एक कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका पूर्णपणे झोकून देऊन करायली हवी असं मला वाटतं. देवा श्री गणेशा या मालिकेतून गणपतीच्या ११ दिवसांत बाप्पाविषयीच्या अश्या ११ गोष्टी पाहायला मिळतील ज्याची आपल्याला फारशी माहिती नाही. स्टार प्रवाह आणि स्वस्तिक प्रोडक्शन्सच्या रिसर्च टीमने यावर खूप मेहनत घेतली आहे. मालिकेचा सेट, आम्हा कलाकारांचा लूक सारं काही भव्यदिव्य आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात आजवर इतकी भव्यदिव्य मालिका प्रेक्षकांनी पाहिली नसेल. त्यामुळे देवा श्री गणेशा ही ११ भागांची मालिका नक्कीच वेगळी ठरेल याची मला खात्री आहे.’

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अश्या गोष्टी ज्या आपण ऐकल्या आहेत पण त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे. ही ११ भागांची ही विशेष मालिका २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj vishnu to portray shiva in deva shree ganesha serial ssv
First published on: 17-08-2020 at 13:46 IST