सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस १४’ प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. शोच्या पहिल्या दिवसापासून गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री पवित्रा पुनिया या दोन स्पर्धकांच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉसच्या घरात एण्ट्री करताच सीनिअर हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुल्का राहुलला एक टास्क देतात. तो टास्क पूर्ण करण्यासाठी राहुलला पवित्रा मदत करते. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते असल्याचे पाहायला मिळते. पण आता त्या दोघांमध्ये जोरदार भांडण होणार आहे. तसेच पवित्रा रागाच्या भरात त्याला कानशिलात लगावेन असे म्हणताना दिसत आहे.
बिग बॉसच्या कालच्या भागाच्या शेवटी राहुल वैद्य आणि पवित्रामध्ये भांडण झाल्याचे दिसत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात प्रत्येकाला काम करावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण घराची कामे सगळ्या स्पर्धकांमध्ये वाटण्यात आली आहेत. अशातच राहुलला बाथरुमची साफसफाई करण्याचे काम देण्यात आले आहे. पण बाथरुममध्ये टीशू पेपर पडलेले असल्याने बाथरुम अस्वच्छ वाटत आहे असे पवित्रा राहुलला बोलते.
ते ऐकून राहुलला राग येतो आणि तो पवित्रावर चिडतो. ‘तू बिग बॉसच्या घराची दादा नाहीस’ असे राहुल रागात पवित्राला बोलतो. त्यावर पवित्रा मी बॉस व्हायला इथे आलेले नाही. त्यानंतर राहुल तिने बनवलेल्या जेवणाला नाव ठेवतो. त्यामुळे पवित्रा संतापते आणि राहुलला त्याचे जेवण वेगळे बनवायला सांगते. त्यानंतर पवित्राला प्रचंड राग येतो आणि ती राहुलला कानशिलात लगावेन असे म्हणते.
दोन दिवसांपूर्वी राहुल आणि पवित्रा यांच्या मैत्रीच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांमध्ये चांगले बाँडिंग असल्याचे म्हटले जात होते. पण आज त्यांच्यामध्ये होणारी भांडणे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.