आयुष्यात रंग भरण्यासाठी आणि मूड फ्रेश करण्यासाठी कॉलेज कट्ट्यापेक्षा दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. मैत्री, प्रेम आणि तरुणाईचा सळसळता उत्साह कॉलेजमध्येच पाहायला मिळतो! या कट्ट्यावर होणाऱ्या गप्पा-टप्पा, मौज- मस्ती पुन्हा एकदा अनुभवण्याची नामी संधी प्रेक्षकांना आगामी ‘फोटोकॉपी’ या सिनेमातून मिळणार आहे. व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि ‘नेहा राजपाल प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
कॉलेज जीवनावर आधारीत असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना आपल्या कॉलेज जीवनात डोकावयाला मदत करतो. मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टी या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून, पुण्यातील लवासा येथील निसर्गरम्य परिसरात झालेल्या या सिनेमाचे चित्रिकरण झाले आहे. चेतन चिटणीस आणि पर्ण पेठे या फ्रेश जोडींचा रोमान्स ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो . तसेच जुळ्या बहिणीची गंमत यात दिसत असून, एक हटके लव्ह ट्रॅन्गल यात पाहायला मिळते. जग कितीही मॉडर्न झाले तरी ‘प्रेम’ ही कधीच न बदलणारी संकल्पना आहे, ‘फोटोकॉपी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हेच पाहायला मिळते.
या चित्रपटाबद्दल सांगताना हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे पर्ण सांगते. यात माझी दुहेरी भूमिका असून, माझ्यातल्या दोघी पडद्यावर साकारण्याचा मी सर्वोतोपरी प्रयत्न केला असल्याचे तिने सांगितले. शिवाय चेतन चिटणीस हा नवोदित अभिनेता फोटोकॉपी मधून डेब्यू करत असल्यामुळे तो देखील आपल्या या पहिल्या फिल्मसाठी खूप उत्साही असल्याचे सांगतो.
कॉलेज तरुणांचे भावविश्व टिपणारा हा सिनेमा विजय मौर्य यांनी दिग्दर्शित केला असून, योगेश जोशी सोबत त्यांनी सिनेमाची पटकथा आणि संवाद देखील लिहिले आहेत. जाहिरात क्षेत्रात अग्रगण्य असलेले विजय मौर्य ‘फोटोकॉपी’ मार्फत प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. या सिनेमाबाबत सांगताना विजय मौर्य यांनी ‘या चित्रपटाची कथा तशी गंमतीची आणि मजेशीर असल्याचे सांगितले. ‘तसेच सिनेमाच्या ‘फोटोकॉपी’ या नावाचा अर्थदेखील त्यांनी स्पष्ट केला. यांजबरोबर निर्माती नेहा राजपाल यांनी आपल्यावर या सिनेमाच्या दिग्दर्शकाची मोठी जबाबदारी टाकल्याबद्दल मी त्यांचे आभार मनात असल्याचे विजय मौर्य यांनी सांगितले. प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरलेली गायिका नेहाने देखील या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा असल्याचे सांगतात. पर्ण आणि चेतन या फ्रेशजोडीसोबतच वंदना गुप्ते यांची देखील विशेष भूमिका ‘फोटोकॉपी’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमात मी एका आधुनिक विचाराच्या आज्जीची भूमिका करत असल्याचे त्यांनी सांगितले. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2016 रोजी प्रकाशित
‘फोटोकॉपी’ चा युथफूल ट्रेलर प्रदर्शित
जुळ्या मुलींची हटके कथा या सिनेमात पाहता येणार आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-08-2016 at 21:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photocopy marathi movies trailer release