अभिनेता कमल हसन यांच्याविरोधात हिंदू मक्कल काची संघटनेने तिरुनवेली जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने संघटनेने कमल हसनला न्यायालयात खेचले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एका तामिळ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमल हसन यांनी महाभारतावर एक टिपणी केली. ‘महाभारतात पुरुष जुगार खेळत असताना द्रौपदीचा एक प्यादा म्हणून वापर केला गेला. तिला दुय्यम स्थान दिले गेले आणि भारत असा देश आहे जो महिलेला जुगारासाठी एक प्यादा म्हणून वापरलेल्या महाभारताला मान देतो.’

न्यूज मिनिट रिपोर्ट्स नुसार, हिंदू मक्कल काचीचे प्रदेश सरचिटणीस रामा रवीकुमार म्हणाले की, ‘महाभारतात द्रौपदीचा वापर पुरुषांनी जुगारासाठी एक प्यादे म्हणून केला आणि अशा पुस्तकाचा आदर केला जातो अशापद्धतीच्या गोष्टी कमल हसन यांना बोलण्याची आवश्यकता नव्हती. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात महाभारताबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार काय?’

विश्वरुपम सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा अनेक मुसलमान समुहांनी या सिनेमाला विरोध केला. (सिनेमात मुस्लिम धर्माची नकारात्मक बाजू दाखवण्यात आली होती) ‘राज्यात सुरक्षित वाटेल असे काहीच शिल्लक नाही. त्यामुळे इथून निघून दुसरीकडे राहायला जाण्याचा विचार मनात येतो,’ असे वक्तव्य कमल हसन यांनी केले होते. रवीकुमार आपला राग व्यक्त करत म्हणाले की, ‘इतर कोणत्याही धर्माबद्दल बोलण्याची त्यांची हिंमत नाही. ते हिंदूविरोधी आहेत म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली. बऱ्याच दिवसांपासून आम्ही काहीही न बोलता समोर जे काही घडते आहे ते सहन करत होतो.’ हिंदू मक्कल काची संघटनेच्या सदस्यांनी १५ मार्चला चेन्नईतील पोलीस आयुक्तालयात कमल हसन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.