एक अनोखा विषय घेऊन २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेत्री कंगना रणौत आणि राजकुमार रावचा ‘क्वीन’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर प्रचंड गाजला. हटके कथानक, दोघांचा सर्वोत्तम अभिनय यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तेव्हापासूनच त्याच्या सिक्वलची जोरदार चर्चा झालेली. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना राजकुमारने या सिक्वलच्या कथेविषयी माहिती दिली.
ऐन लग्नाच्या दिवशी मुलाने नकार दिल्यानंतर खचलेली राणी (कंगना) एकटीच हनिमूनला जाते. त्या प्रवासात आलेल्या अनुभवांनी ती समृद्ध होते, तिच्या व्यक्तिमत्त्वात कमालीचा बदल घडून येतो. बदललेली राणी नंतर विजयलाही (राजकुमार) आवडू लागते. आपण इतक्या चांगल्या मुलीला गमावल्याची खंतही त्याला होते. पण ती परतल्यावर विजय जेव्हा तिला पुन्हा एकदा लग्नासाठी विचारतो, तेव्हा मात्र राणी नकार देते. इथेच या चित्रपटाचा शेवट होतो. नकार दिल्यानंतर विजयचं काय होतं, राणीच्या आयुष्यात कोणते बदल येतात हे सिक्वल म्हणजेच ‘क्वीन २’मध्ये दाखवण्याचा विचार केला होता, असं राजकुमारने म्हटलं. ‘मी आणि दिग्दर्शक मिळून सिक्वलमध्ये विजयच्या भूमिकेवर जास्त लक्ष केंद्रीत करण्याचा विचार करत होतो,’ असं त्याने सांगितलं.
वाचा : वाल्मिकी समाजाच्या आंदोलनांनंतर शिल्पाने मागितली माफी
‘क्वीन’ चित्रपटात कंगनाने स्त्री-प्रधान भूमिका साकारली होती आणि त्याच्या प्रचंड यशानंतर तिला बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणू लागले. त्यामुळे आता सिक्वलमध्ये राजकुमारच्या भुमिकेला जास्त महत्त्व दिले जाणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. हा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याबाबतची अधिक माहिती मात्र राजकुमारने दिली नाही. पण प्रेक्षकांमध्ये मात्र या सिक्वलची उत्सुकता नक्कीच असेल असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.