करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या जगभरातील लोक त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाउनमुळे दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे. मात्र या सर्वांमध्ये करोना विषाणूचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर ते आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. करोनामुळे त्यांचे विदेश दौरे रद्द झाले आहेत, असा उपरोधिक टोला अभिनेता कमाल आर खानने मोदींना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाला कमाल खान?

कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
“करोना विषाणूचा सर्वाधिक फटका नरेंद्र मोदींना बसला आहे. कारण त्यांचे सर्व विदेश दौरे रद्द झाले आहेत. गेल्या १०० दिवसांमध्ये त्यांनी एकही दौरा केलेला नाही. भारताच्या इतिहासात ही घटना स्वर्ण अक्षरात लिहून ठेवायला हवी.” अशा आशयाचे ट्विट करुन कमाल खानने मोदींना टोमणा मारला आहे.

कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जाणांनी केआररेवर टीका देखील केली आहे.