पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात स्वच्छतेचे अभियान सुरू करून अनेकांना या अभियानात सहभागी करून घेतले. पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केल्यापासून देशातील क्रीडापटू, उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी, सरकारी आणि सार्वजनिक कार्यालये, सामाजिक संस्थांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वजण आपापल्यापरीने यात योगदान देत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, हृतिक रोशन इत्यादी अनेकांनी स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदविला असून, आता बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयनेदेखील हातात झाडू घेऊन स्वच्छतेच्या या अभियानात स्वत:ला झोकून दिले आहे. त्याच्या या कार्याचे खुद्द पंतप्रधान मोदींनी कौतुक केले असून, विवेकचे कौतुक करणारा संदेश पंतप्रधानांनी @narendramodi या आपल्या खासगी टि्वटर खात्यावर पोस्ट केला आहे. खुद्द पंतप्रधांनांनी कौतुक केल्याने सामाजिक कार्यात योगदान देणारा विवेक ओबेरॉय भारावून गेला आहे. याविषयी टि्वटरवर आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकामुळे सन्मानीत झाल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानाविषयीची बांधिलकी जपत विविध माध्यमांतून योगदान देत राहण्याची ग्वाहीदेखील त्याने या संदेशात नमूद केली.