सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत जोरदार ट्रेण्ड होत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने त्यांची ही मुलाखत घेतली आहे. यावेळी त्याने मोदींना सोशल मीडियाबाबतही काही प्रश्न विचारली. ‘सोशल मीडियावर तुम्ही सक्रीय असता. अनेकजण तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न विचारत असतात. तुम्ही स्वत: त्याकडे लक्ष देता का,’ असा प्रश्न अक्षयने विचारला. त्यावर मोदींनी गमतीशीर पद्धतीने उत्तर दिलं.

‘सोशल मीडियावर माझं लक्ष असतं. कारण त्यामुळे मला बाहेर काय चालू आहे हे समजतं. मी ट्विंकल खन्ना यांचेसुद्धा ट्विट्स वाचतो. कधी कधी मला वाटतं की ट्विटरवर त्या माझ्यावर ज्याप्रकारे राग व्यक्त करत असतात त्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल. कारण त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो. एकप्रकारे मी तुमची मदतच करत आहे,’ असं उत्तर मोदींनी दिलं. यावेळी मोदींनी ट्विंकल खन्नाच्या आजोबांच्या भेटीचा किस्सासुद्धा सांगितला.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्सबद्दल तुम्हाला काय वाटतं, असाही प्रश्न अक्षयने विचारला. त्यावर मीम्स तयार करणाऱ्यांच्या कल्पक बुद्धीचं मला फार कौतुक वाटतं, असं ते म्हणाले.