रेश्मा राईकवार
एखादा गोष्टीवेल्हाळ, एखादा कवितेवर प्रेम करणारा, एखादा भवतालाच्या सौंदर्यात हरवणारा.. व्यक्तिगणिक अंतरंगात वेगळे भाव घेऊन जगणारे असे कितीक आपल्या आजूबाजूला असतात. आपल्याच माणसाच्या अंतरंगात शिरून त्याला समजून घेण्याइतका संयम आपल्याकडे बव्हंशी नसतो.. मग उरतो तो कोरडा संवाद. सध्याच्या काळात या कोरडया संवादापलीकडे जात आपलीशी वाटणारी माणसं घट्ट धरून ठेवायला हवीत, हे सांगणारी जगण्याची अर्थपूर्ण गोष्ट म्हणजे ‘एकदा काय झालं’..

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘ एकदा काय झालं’ हा चित्रपट त्यांच्या या आधीच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. कथा-कल्पना आणि मांडणीतला साधेपणा, सच्चेपणा कायम ठेवत गोष्टीतली गोष्ट रंगवण्याचा प्रयोग या चित्रपटात दिग्दर्शकाने केला आहे. गोष्टी सांगणाऱ्या माणसाची ही गोष्ट आहे. त्यामुळे त्याची चित्रपटीय मांडणीही गोष्टींचं जग उभी करणारी आहे. गोष्टी सांगणारा नायक, त्याच्या गोष्टीत हरवून जाणारा त्याचा मुलगा, त्याची शाळा, आजूबाजूला गोष्टींची पुस्तकं, लहान मुलांची आवडती कार्टून्स अशी थोडी परिकथांकडे झुकणारी मांडणी चित्रपटात दिसते.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

मुलांना गोष्टीच्या माध्यमातून रोजच्या जगण्यातले अनेक क्लिष्ट वाटणारे विषयही सहज आणि सोपेपणाने समजावून सांगता येतात, यावर या चित्रपटाचा नायक किरणचा विश्वास आहे. मुलांना गोष्टींच्या माध्यमातून विज्ञान, गणितासारखे विषय शिकवणारी, नीतीमूल्ये – संस्कार देणारी शाळा किरणने सुरू केली आहे. किरणच्या गोष्टी, तो जे काही सांगतो, करतो, वागतो, बोलतो.. त्या सगळय़ाचा मोठा प्रभाव त्याच्या मुलावर चिंतनवर आहे. बाबा म्हणेल ती पूर्वदिशा असं मानणाऱ्या चिंतन आणि बाबाचं खूप घट्ट नातं आहे. आई-बाबा, आजी-आजोबा आणि नातू असं छोटं चौकोनी, सुखी, आदर्श वागणारं आणि समाजातही आदर्श निर्माण करण्यासाठी धडपडणारं हे कुटुंब. साठा उत्तराची सुफळ संपूर्ण कहाणी असल्यागत वाटणारी ही गोष्ट एका घटनेने हडबडते. गडबडते. त्यातल्या प्रत्येक पात्राला हलवून सोडते. आणि तरीही ज्याची त्याची गोष्ट ज्याच्या-त्याच्यापर्यंत पोहोचते, पूर्ण होते आणि पुढे जाण्याचं बळही देते.

या चित्रपटाची कथा पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा सगळय़ाच बाजू डॉ. सलील कुलकर्णी यांनी एकहाती सांभाळल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मुळातच हळूवार-चिंतनशील स्वभाव, मुलांशी संवाद साधण्यात असलेली हातोटी, मुलांच्या नजरेतून आजूबाजूचं जग पाहण्याची आणि ते इतरांनाही दाखवण्याची समज या सगळय़ाचा प्रभाव चित्रपटाच्या मांडणीवर आहे. तांत्रिक बाजूत चित्रपट कुठेही कमी पडत नाही. थोडीशी गोष्टीच्या चौकटीतील काहीशी स्वप्नाळू, आदर्शवत वाटणारी मांडणी आणि पूर्वार्धात खूप संथपणे सरकणारी कथा यामुळे काहीसे गोंधळून गेल्यासारखे होते. मात्र उत्तरार्धात गोष्टी वेगाने पुढे सरकतात. त्याहीपेक्षा या चित्रपटाचा गाभा असलेले वडील आणि मुलाचे नाते, त्यांच्यातील भावनिक संवाद आणि त्याअनुषंगाने गोष्टीतील काही पात्रांचं गुंतत जाणं, काहींचं मोकळं होणं हा भावनालेख अधिकाधिक रंगत जातो. मुळात स्वत:वर संयम ठेवून मुलांचा उत्साह, त्यांचा कल लक्षात घेत त्यांच्याशी संवाद साधला तर चांगल्या-वाईटाची योग्य जाण त्यांच्यात सहज निर्माण करता येते, हे इथे दिग्र्दशकाने खूप सुंदर पद्धतीने दाखवून दिले आहे. चांगलं काय हे नुसतं सांगून भागत नाही, ते आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. तसंच कुठून शिकून येतात मुलं.. या प्रश्नाचंही उत्तर दिग्दर्शक देतो. आपण, आपल्या घरातील माणसं, मित्र परिवार, शिक्षक यांच्या अनुकरणातूनच जगाबद्दलचं आकलन त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं, अशा खूप छोटय़ा-छोटय़ा पण मोलाच्या गोष्टी दिग्दर्शक मार्मिकपणे गोष्टीच्या ओघात सांगून जातो. एकदा काय झालं.. या शैलीत सुरू होणारी ही गोष्ट आजच्या काळाचं वास्तव सांगणारी, भविष्यात तरुण होणाऱ्या पिढीचं एक बोट आपल्या हातात आहे. ते धरूनच ती पुढे जाते आहे, याचं योग्य भान आणून देणारी आहे. त्यामुळे लहान-मोठे दोघांनाही या गोष्टीची मात्रा चांगली लागू पडणारी आहे. लेखकाने शब्दात रंगवलेला हा भावनापट अभिनेता सुमीत राघवन याच्या सहजअभिनयाने अस्सल रंगला आहे. आपल्या ध्येयात रमलेला, पण समाजाप्रति असलेली जबाबदारी ओळखणारा, पुढची पिढी घडवण्याची तळमळ बाळगून असणारा एक सजग, सुजाण नागरिक ते एक कर्तव्यदक्ष मुलगा, प्रेमळ बाबा, संकटाची चाहूल लागल्यानंतर खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नीचा आधार घेणारा नवरा.. वा एकाक्षणी थकून आईच्या कुशीत शिरून ओक्साबोक्सी रडणारा मुलगा अशा कितीतरी छटा सुमीतने ज्या सहजतेने रंगवल्यात त्याला तोड नाही. चिंतनची भूमिका करणाऱ्या अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकारानेही गोष्टीचा गर्भितार्थ जणू त्याच्या लक्षात आला आहे इतक्या छान पद्धतीने सुमीत आणि इतर कलाकारांना साथ दिली आहे. मोहन आगाशे, सुहास जोशी, ऊर्मिला कानिटकर, पुष्कर श्रोत्री या ताकदीच्या कलाकारांबरोबर बालकलाकारांनीही खूप सहज पण प्रभावीपणे आपल्या भूमिका केल्या आहेत. सलील कुलकर्णीचेच संगीत असल्याने तीही बाजू चित्रपटात महत्त्वाची ठरते. त्यातही शंकर महादेवन यांनी गायलेले ‘रे क्षणा’ हे गाणे मनाला स्पर्शून जाते. प्रत्येक वेळी तात्पर्यच महत्त्वाचं असतं असं नाही. गोष्टीत शिरून त्यातली प्रत्येक पात्रं समजून घेत गेलं की ती हळूहळू आपल्याला उलगडत जाते. काहीतरी सांगून जाते किंवा काहीच नाही तर निखळ मनोरंजन करून जाते. ‘एकदा काय झालं’ ही असंच काही सांगू पाहणारी गोष्ट आहे.

‘ एकदा काय झालं ‘ दिग्दर्शक – डॉ. सलील कुलकर्णी
कलाकार
– सुमीत राघवन, उर्मिला कानिटकर, अर्जुन पूर्णपात्रे, मोहन आगाशे, राजेश भोसले, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे.