आज तंत्रज्ञानाच्या युगात व्हिडीओ गेम्सकडे मनोरंजनाचे एक उत्तम साधन म्हणून पाहिले जाते. या खेळांना अधिकाधिक आकर्षक व वास्तवदर्शी करण्याचे प्रयत्न संगणक तज्ज्ञांकडून सुरु असतानाच त्यांनी ‘रेक रुम’, ‘द क्लाइंब’, ‘ह्य़ुमन बॉडी’, ‘सुपरहॉट व्हीआर’, ‘फायटर जेट’ यांसारख्या अचाट करणाऱ्या एकाहून एक सरस अशा व्हिडीओ गेम्सची निर्मिती केली. पण या संशोधनात चांगल्या खेळांबरोबरच ‘रेसिडेंट इव्हिल’, ‘आय एक्सपेक्ट यु टू डाय’, ‘ब्लू व्हेल’, ‘बॅटलफिल्ड’, ‘पोकेमॉन गो’ यांसारख्या काही विकृत खेळांचीही निर्मिती होत गेली. ज्यांच्यामुळे आजवर हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दिग्दर्शक जेम्स वॅन हे अशाच काही घातक खेळांवर आधारित चित्रपट तयार करण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटात ‘एक्समेन’ फेम सुपरस्टार ह्य़ु जॅकमन व रायन रेनॉल्ड यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जेम्स यांना या चित्रपटात व्हिडीओ गेम्सचे जग दाखवण्याची इच्छा आहे. एखाद्या खेळाची निर्मिती कशी होते? त्याच्या निर्मितीमागील उद्देश काय असतो?  सामान्य व्यक्ती कोणत्या दृष्टिकोनातून या खेळांकडे पाहतो? हे खेळ खेळायला लागल्यानंतर खेळाडूंच्या शारीरिक व मानसिकतेत होत जाणारे बदल यावर दृष्टिक्षेप टाकणारा चित्रपट तयार करण्याची तयारी जेम्स वॅन करत आहेत. चित्रपटाची पटकथा ‘पोकेमॉन गो’ व ‘ब्लू व्हेल’ या दोन खेळांच्या संकल्पनेवर आधारित आहे. या दोन्ही खेळांनी गेल्या वर्षभरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ‘पोकेमॉन गो’ या खेळात खेळाडूंना जीपीएस यंत्रणेचा वापर करून ठिकठिकाणचे पोकेमॉन पकडण्याचे आव्हान होते. जितके जास्त पोकेमॉन तितके जास्त गुण अशी या खेळाची रचना होती. तर ‘ब्लु व्हेल’ या खेळात खेळाडू स्वत:ला शारीरिक इजा पोहचवेल अशी काही कठीण कृत्ये करायला भाग पाडले जायचे. या दोन्ही खेळांचा शेवट हा जवळ जवळ त्या खेळाडूच्या मृत्यृतच होत होता. परिणामी जगभरातून या खेळांवर बंदी घालण्यात आली. ह्य़ु जॅकमन व रायन रेनॉल्ड या दोन्ही अभिनेत्यांनी अद्याप या चित्रपटासंदर्भात काही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी यांसारख्या वेगळ्या विषयांवर काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.