अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत असे मानले जाते, पण अलीकडच्या काळात मानवी जीवनात इंटरनेट या आणखीन एका नवीन गरजेची भर पडली आहे. इंटरनेटच्या मदतीने ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंतची कोणत्याही विषयावरील माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळवता येते. त्यामुळेच याला माहितीचा महासागर असेही म्हणतात. परंतु समुद्रात त्सुनामी, भूकंप, चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती अधूनमधून येत असतात त्याचप्रमाणे या माहितीच्या महासागरातही ट्रोजन, व्हायरस, नेटवर्क हॅकिंग, मालवेअर, अॅडवेअर, रॅन्समवेअर यांसारख्या मानवनिर्मित आपत्ती येत असतात.
२०१७ हे वर्ष सायबर गुन्हेगारांसाठी विशेष अनुकूल ठरले. सायबरतज्ज्ञांच्या अहवालानुसार आजवरच्या सर्वात जास्त इंटरनेट गुन्ह्य़ांची नोंद या वर्षांत झाली आहे.गेल्या सहा महिन्यांत जगभरातील लाखो लोकांनी त्यांची बँक खाती हॅक झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. या यादीत आता हॉलीवूड दिग्दर्शक स्टॅन ली यांचीही भर पडली आहे. इंटरनेट चोरांनी लीच्या खात्यातून तब्बल तीन लाख अमेरिकी डॉलर्स लंपास केले आहेत. त्यांनी या संदर्भात पोलीस तक्रार केली असून सायबरतज्ज्ञ रायन केली यांच्या देखरेखीखाली या चोरीचा कसून तपास केला जात आहे.
गेले काही दिवस स्टॅन ली यांना काही अनोळखी व्यक्तींचे धमकी देणारे ई-मेल येत होते. परंतु त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि अचानक एके दिवशी मोबाइलवर बँक खात्यातून तीन लाख अमेरिकी डॉलर्स चोरल्या गेल्याचा संदेश आला. सायबर पोलिसांनी या चोरीची गांभीर्याने नोंद घेतली असून चोरांचा कसून शोध घेतला जात आहे. सर्वात प्रथम त्यांनी ज्या संगणकावरून खाते हॅक केले गेले त्याचा शोध लावला, परंतु चौकशीअंती त्या संगणक मालकाच्याही खात्यातून पैसे चोरले गेल्याचे लक्षात आले. स्टॅन ली यांना जेव्हा धमकीचे ई-मेल आले होते तेव्हा त्यांनी कोणा सायबरतज्ज्ञाच्या मदतीने आपल्या बँक खात्यांचे पासवर्ड बदलले होते. परंतु चोरी झाल्यापासून तो सायबरतज्ज्ञदेखील नाहीसा झाला आहे. त्यामुळे रायन यांच्या मते ही चोरी अगदी नियोजनबद्द पद्धतीने केली गेली असून त्यामागे ली यांच्या संपर्कातील कोणा व्यक्तीचा हात असण्याची शक्यता आहे.