मागील काही दिवसांपासून सोशल साईटसवर बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्याविषयी बदनामीकारक मजकूर पसरवला जात होता. आमिर खान हा मुस्लिम समुदायासाठी निधी उभारत असल्याच्या बातम्या गेले अनेक दिवस सोशल साईटसवर पहायला मिळत होत्या. आमिर खानने याविषयी पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर केरळ येथील कोझीकोडमधून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेला हा संशयित इसम माजी शासकीय अधिकारी असून तो सोशल साईटसवर आमिर खानविषयी बोगस तसेच बदनामीकारक मजकूर पसरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.  आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्युमॅनिटी ट्रस्ट या संस्थेसाठी निधी गोळा करण्याचे आवाहन केले जाते. मात्र, ह्युमॅनिटी ट्रस्ट ही संस्था या निधीचा वापर प्रत्यक्षात मस्जिदी बांधण्यासाठी आणि मुस्लिम समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरत असल्याची चुकीची माहिती सोशल साईटसवर पसरविण्यात येत होती. आमिर खान याने याविषयी स्पष्टीकरण देताना ह्युमॅनिटी ट्रस्ट संस्थेतर्फे गोळा करण्यात येणारा निधी योग्य कारणासाठी वापरण्यात येत असल्याचे सांगितले आहे.