लॉकडाउनमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याला कलाकार देखील अपवाद नाहीत. झी युवावरील ‘साजणा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आणि आता एका नव्या भूमिकेत ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मध्ये दिसणारी प्रेक्षकांची लाड़की अभिनेत्री पूजा बिरारी देखील एका अडचणीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात तिच्यावर अनेक संकटे आली. त्या बद्दल बोलताना पूजा म्हणाली, “नमस्कार मी पूजा बिरारी, मी एक कलाकार आहे. तुम्ही मला झी युवा वाहिनीवर साजणा या मालिकेत पाहीलत आणि रमा या माझ्या व्यक्तिरेखेवर भरपूर प्रेम ही केलं. या लॉकडाउनमध्ये देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि त्यामुळेच आपल्या सध्याच्या सरकारने सर्व गोष्टींची काळजी घेत न्यू-नॉर्मल लाईफचे आवाहन केले. आपली मनोरंजनसृष्टीसुद्धा हळूहळू का होईना सुरु झाली. पण काही प्रॉब्लेम्स हे मालिकांच्या बिहाइंड द सीनसारखे आहेत आणि सध्या कलाकार म्हणून माझ्या बाबतीत ते घडत आहेत. म्हणूनच मला ते माझ्या लाडक्या प्रेक्षकांसमोर आणायचे आहेत.”

सध्या करोनाच्या या संकटात कलाकार म्हणून तुम्हाला मुंबईमध्ये काम मिळेल मात्र राहायला भाड्याचे घर मिळणं कठिण झालंय. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत काम करण्याची मला पुन्हा संधी मिळाली. सध्याच्या परिस्थितीमध्ये एक चांगले काम मिळणं हे प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाचे आहे जे मला मिळालं. मात्र ते जर तसच ठेवायच असेल तर मला मुंबईमध्ये राहयाला भाड्याने घर हवंय. पण ते काही सध्या मिळताना दिसत नाही आणि मला आता खरंच घर शोधण्याचा आणि सतत नकार मिळण्याचा कंटाळा आलाय असे ती पुढे म्हणाली.

मालिकेच्या सेटवर जागा अरेंज करण्याचा प्रयत्न केला पण ऑलरेडी अप्पा आणि काही इतर लोक शूटिंग सुरु झाल्यापासून राहत असल्यामुळे रूम्स नाहीत. त्यामुळे ते शक्य झाले नाही. सध्या मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे माझे सहकलाकार, सोहम निर्मिती संस्था आणि झी युवा वाहिनी सगळेच माझ्यासाठी घर शोधत आहेत. मात्र सध्या कोणत्याच सोसायटीमध्ये नविन व्यक्तीला प्रवेश नाही. मी आणि माझ्यासारखे अनेक कलाकार बाहेरच्या शहरातून मुंबईमध्ये कामा-निमित्त येतात. या लॉकडाऊनमध्ये न्यू-नॉर्मलचे पालन करत स्वतःची आणि इतरांची काळजी घेत आम्हाला काम करायचे आहे. पण काही निवडक सोसायटी सेक्रेटरी आम्हाला लॉकडाउनच्या नावावर जागा द्यायला नकार देत आहेत. सध्या सगळं हळूहळू सुरु झालंय पण अजूनही न्यू नॉर्मलचे रूल्स मानले जात नाही. स्वतःची काळजी घेऊन जर काम नाही सुरु करू शकलो तर कसं होणार? मला अजूनही घर मिळत नाही आहे. कलाकरांना होणाऱ्या या त्रासाबद्दल कोणी काही मार्गदर्शन करू शकेल का?” असे पूजा म्हणाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja birari asking for home avb
First published on: 20-08-2020 at 18:31 IST