ढिंच्यॅक पूजा हे सध्याचं भलतंच गाजत असलेलं प्रकरण. त्या निमित्ताने एकूणच सेल्फी ते समाजमाध्यमी संस्कृतीचा तिरका छेद घेणारा हा वेगळ्याच, म्हणजे आजच्या तरुणाईच्या वगैरे म्हणतात त्या समाजमाध्यमी शैलीतला लेख..
सगळे बिचाऱ्या पूजाला शिव्या घालतात, पण सर्वाना पूजासारखंच ढिंच्यॅक व्हायचंय. कारण तिला कित्तीतरी मिलियन व्ह्य़ूज आहेत.
ढिंच्यॅक ‘हिला’ एवढे प्रेक्षक कसे काय बुव्वा?
लाइक्स मिळण्यासाठी जगतोय असं वाटतंय. मी आणि माझ्या काळातले मला भेटणारे सारेच. लाइक्ससाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. काही तर अक्षरश: लाइक्स मिळतील अशा विषयांवर ढिंच्यॅक कविता करतात. पाप. मला वाटतं जगात टिकते, ती कविता. पोएट्री. ती आहे म्हणून जगातल्या मनांत ओलावा आहे.
मला कविता होत नाही, म्हणून मला तिची महती माहितीये. मला हे असे मोठाले लेख लिहिता येतात. दुर्दैवी मी.
इतका की, हा ढिंच्यॅक लेख लिहायच्या आधी याला किती वाचक मिळतील, हेच माझ्या मनात. किडलंय मन.
कुठे समुद्र पाहिला, मॉल पाहिला, मेरियट पाहिलं, कुणी सेलिब्रिटी दिसला, कुणी लग्न केलं, कुणी मेलं की खाज सुटते..आत. कुठे ते कळत नाही. हात आपोआप खिशाकडे जातो. मी चेहऱ्यावरचे तेल, मळ पुसून, लाइट तोंडावर घेत स्वार्थी होऊन पुढे आणि बाकीचे येडे मागे असे ढिंच्यॅक सेल्फी काढतो. भारी वाटतं. एकमेकांचे दुश्मनपण एकत्र सेल्फी काढताना स्माइल करत असतील.
पूजा याहून वेगळं काय करते? हेच करते की ती! ती सेल्फी काढून गाणं म्हणते.
सेल्फी काढला की, मी तो तीन वेळा तपासतो. एडिटमध्ये बाकीच्यांना ब्लर आणि मला गोरं करतो आणि ढिंच्यॅक कोटी करून सेल्फीली ती पिनअप करून पोस्ट मारतो. मग पुढचे काही तास मस्त किती किती किती करत जातात. पन्नासच्यावर लाइक्स आले तर भरून पावलं. शंभर क्रॉस केले, की. ऑर्गझम. मनात युद्ध सुरू होतं – हा समोरचा क्षण मनात साठवून ठेवूया? का मोबाइलमध्ये?
हल्ली मी मोबाइलमध्ये साठवू लागलो आहे. मोबाइल हा माझा खासगी अवयव आहे. तो कुणा दुसऱ्याच्या हातात गेला की माझं बीपी शूटअप होतं.
मी लाइक्ससाठी रस्त्यात एकदा भेटलेला, कुणाच्या परात्पर ओळखीचा, कधी बसप्रवासात शेजारी बसलेला, कुणाचा मावसभाऊ, कुणीचा एक्स, कुणाची चिकणी काकी, कुणाचा प्रिय कुत्रा, कुणाचा बोका सगळ्यांना बिनदिक्कत मित्र बनवतो. लाइक्स ही करन्सी आहे. मला हे पटायला वेळ गेला. आता पटलंय. पूजाला हे खूप आधीच कळलं आहे.
माझ्या परिचयातले तीन मित्र आहेत. ते पूर्वी एकमेकांच्या जिवाभावाचे होते. अडीअडचणीला तोंडातला घास टाकून धावणारे वगैरे अशा कॅटेगरीमधले. मग त्यांनी सोशल मीडियावर येऊनपण मैत्री केली. आणि आता ते प्रत्यक्ष भेटले कीसुद्धा सोशल मीडियावर भेटल्यासारखेच भेटतात. तशाच मिठय़ा मारतात. कमेंट्स पास करतात. भेटतात क्वचितच, पण भेटले की पहिल्यांदा सेल्फी काढून सोडतात. सोबत ढिंच्यॅक कोटी. भेटीदरम्यान आपण किती लाइक्स काढू शकलो, हे बोलतात. मग लाइक्स मिळवण्यासाठी भेटत जाऊया रे वगैरे वगैरे चालू होतं. आता तर ते तिघे अजून जिवाभावाचे झाले आहेत. मी अशा मित्रांवर खूप जळतो. मला असे मित्र नाहीयेत. मला अशी फक्त लोकांना दाखवण्यासाठीची मैत्री करायची आहे.
पूजाला पण ऑडीमध्ये बसलेले चार मित्र जवळचे आहेतच की. ते बैठा नाच किती छान करतात. खासकरून मागचे तिघे.
मला मदर्स डेला ओटय़ाशी जुंपलेल्या आईच्या गळ्यात हात टाकून फोटो काढून पोस्ट मारावा वाटतो. आजोबांच्या पंच्याहत्रीला त्यांना केक फासून आणि स्नो मारून त्यांचा फोटो पोस्ट मारावा वाटतो. मला मी कोणत्या क्रिकेटरसारखा दिसतो हे पाहून ते पोस्ट मारावं वाटतं. मला माझ्या मरणाची तारीख माहीत करून घेऊन ती पोस्ट मारावी वाटते. आणि असं सगळं ढिंच्यॅक पोस्ट मारून मला लाइक्स मिळवावे वाटतात. मी एकुलता एक एकलकोंडा नाही. तरी मला मिनिमम पाच हजार मित्र बनवावे वाटतात.
माझ्या एक्स गर्लफ्रेंडनी मला बड्डेला चार पानी पोस्ट लिहिली आणि खूप किस टाकले. मी तिला फर्स्ट टाइम लव्ह यू कमेंट केली. माझ्या काकांनी त्यावर दोन वटारलेले डोळे टाकले. त्या पोस्टनी ३०० क्रॉस केले.
पूजासारखी स्व्ॉगवाली टोपी मलापण घालावी वाटते. पण मी लाजतो. मलापण पबमध्ये जावं वाटतं. तिथल्या हॉट मुलींना दारू पिताना पाहून मला मॉडर्न वाटतं. मलापण रात्रभर दारू प्यावी वाटते. माझ्यासोबत नाचणारे चार मित्र असावे वाटतात. त्यांच्यासोबत सेल्फी घ्यावे वाटतात.
मग पूजा असं वेगळं काय करते? तर ती हे सारं गाते. हां, पण तिचं गाणं जरा उन्नीस आहे.
मला आवडते ती. पूजाने तिच्या सवंगडय़ांना घेऊन तिच्या कुवतीनुसार ढिंच्यॅक व्हिडीओ बनवून यूटय़ूबच्या समुद्रात सोडला आणि त्याने मस्तच डुबकी मारली. पूजाच्या ढिंच्यॅक व्हिडीओला काही लोकांनी रोस्ट केलं आणि लाइक काढायचा प्रयत्न केला. ढिंच्यॅक पूजाच्या व्हिडीओवर नाना पाटेकर, लतादीदी, मोदी ह्य़ा साऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. काय मजा. मौजच. पण असे किडे करून लाइक काढणारे सगळे अयशस्वी. दुसऱ्याच्या कष्टावर मजा मारणं वाईट.
थोडक्यात, आपण आपापला व्हिडीओ बनवला पाहिजे. इग्म्न फॉईड म्हणतो, एखाद्याला जितक्या शिव्या घालू, जितकी बदनामी करू, जितकं त्याबद्दल बोलू, तितका तो मोठा होत जातो.
ढिंच्यॅक मीही आहे आणि आता सगळेच आहेत. कोणी किती ढिंच्यॅक बनवायचं? कतिी ढिंच्यॅक व्हायचं? हे ज्यानं त्यानं ठरवावं.
मग असं काय वर्क झालं पूजाचं?
बुद्ध म्हणतो, जगात फक्त दुखाची चर्चा आहे. पण सोशल मीडियावर ती कुठे दिसत नाही. तिकडे सारे आलबेल आहे.
आपली पूजा जरा जास्तच ढिंच्यॅक असल्याने ती आपल्या पुढे गेली. यशस्वी ठरली. तिचं अभिनंदन.
आणि साने गुरुजी म्हणतात, कलीयुगात सोशल मीडियाला पर्याय नाही. त्याला भरपूर शिव्या घाला, पण त्या सोशल मीडियावर जाऊनच.
तळटीप – ढिंच्यॅक पूजा यूटय़ूबवरील सगळ्यात फेमस व्यक्ती आहे. माहीत नसेल, तर शरम वाटू द्या जरा
सिद्धेश पूरकर purkarsiddhesh@gmail.com