‘बाहुबली’ सिनेमातला प्रभास हा मितभाषी आहे. नेहमी प्रसिद्धी झोतात असला तरी तो मात्र या सगळ्यापासून दूर राहणंच पसंत करत असतो. पण एकदा का चेहऱ्यावर रंग लागला की तुम्ही लोकांचे होता. मग तुमच्या खाजगी आयुष्यतही लोकं डोकं घालू लागतात. अर्थात या सगळ्या गोष्टी त्या कलाकाराच्या प्रेमापोटीच होत असतात. आपला आवडता कलाकार सध्या काय करत आहे याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असते.

‘बाहुबली’ सिनेमामुळे फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रभास हीट झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीला प्रभास हे नाव नवं नसलं तरी इतर राज्यांसाठी हा एक नवा चेहरा होता. प्रभासला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रसिद्धी मिळवण्याच ‘बाहुबली’ सिनेमाचा सिंहाचा वाटा आहे. पण आता मिळालेल्या या प्रेमाचा स्वीकार नक्की कसा करायचा असाच प्रश्न प्रभासला सध्या पडला आहे.

या सिनेमासाठी पाच वर्ष जिवाचं रान केल्यावर ‘बाहुबली २’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रभास एका महिन्याच्या सुट्टीसाठी अमेरिकेत गेला आहे. पण एकदा का तुम्ही प्रसिद्ध झाला की जगात अशी कोणतीही जागा नसते जिथे तुम्हाला चाहते भेटत नाहीत. प्रभासने नुकताच याचा अनुभव घेतला. अमेरिकेतील एका विमानतळावर त्याच्याभोवती चाहत्यांनी अचानक गराडा घातला होता. अचानक एवढ्या लोकांना पाहून प्रभास जरा भांबावूनच गेला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभास खूपच लाजाळू आहे. तो सार्वजनिक ठिकणी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच राहणे पसंत करतो. अमेरिकेतील विमानतळावर आपले अशा पद्धतीचे स्वागत बघून तो फार भावूक झाला. कदाचित त्याला अशा स्वागताची अपेक्षा नसेल. त्याने त्याच्या अधिकृत फेसबुक अकांटवरून चाहत्यांचे आभार मानले.

‘बाहुबली २’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याने एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २’ सिनेमाने आतापर्यंत १२०० हून अधिकची कमाई केली आहे. यातूनच दोन आठवड्यानंतरही लोकांच्या मनातून ‘बाहुबली’ सिनेमा गेला नाही हे स्पष्ट होते.